आमदार मंदाताई म्हात्रे यांचा पुढाकार
नवी मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पडलेल्या पावसामुळे ओल्या दुष्काळाचे संकट ओढवले आहे. या ओल्या दुष्काळाचा फटका औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे शिक्षण घेणार्या अनेक विद्यार्थ्यांना बसला. राज्यात अनेक ठिकाणी शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांची मुले जेथे जेथे शिक्षण घेत आहेत तेथे जाऊन शहरी भागातील लोकप्रतिनिधीनी मदतीचा हात देण्याची गरज असल्याचे राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केले होते. मुख्यमंत्री यांच्या आवाहनाच्या अनुषंगाने आमदार मंदाताई म्हात्रे यांनी दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मदत केली. एक हात मदतीचा या संकल्पनेतून 300 विद्यार्थ्यांना रुपये सहा लाखांची आर्थिक मदत केली आहे.
हे विद्यार्थी आर्थिक अडचणीत असल्याचे वृत्त पाहिल्यानंतर आमदार मंदाताई म्हात्रे यांच्याकडून आवाहन करण्यात आले होते. म्हात्रे यांच्याकडून रुपये तीन लाख, नवी मुंबई हरयाणा वेल्फेअर असोशिएशन यांजकडून रुपये दोन लाख, तसेच जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, डॉ. राजेश पाटील, माजी नगरसेवक अमित पाटील व नवी मुंबईतील जीवाभावाचे मित्र वॉट्सअॅप ग्रुपच्या सदस्य यांच्याकडून रुपये एक लाख रोख रक्कम विद्यापीठातील विद्यार्थ्यांना थेट त्यांच्या हातात देण्यात आली. या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापक किशोर शितोळे, हरियाणा वेल्फेअरचे अध्यक्ष बलबीरसिंग चौधरी, सत्यवान वर्मा, राजवंती वर्मा, नवी मुंबई जीवाभावाचे मित्र ग्रुपचे सदस्य रवींद्र भगत, मनोज मेहेर, तसेच शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.