महाराष्ट्राच्या राजकारणात शनिवारी अचानक भूकंप झाला आणि शुक्रवारपर्यंत राजकीय सारीपाटावर ज्या चाली खेळवण्यात आल्या होत्या त्या उद्ध्वस्त करून देवेंद्र गंगाधरराव फडणवीस आणि अजित अनंत पवार यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
24 ऑक्टोबर 2019 रोजी भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम या महायुतीला सरकार स्थापन करण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेने कौल दिला असतानाही केवळ भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर ‘हात’मिळवणी करण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला. त्यासाठी त्यांनी सोनिया गांधी, शरद पवार, जयंत पाटील, अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे, बाळासाहेब थोरात आदींसमवेत पंचतारांकित बैठकावर बैठका घेतल्या. शुक्रवारी वरळी या आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात असलेल्या नेहरू सेंटरमध्ये शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आदींबरोबर अंतिम टप्प्यात चर्चा करून सर्वच नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे आणि राज्याचे नेतृत्व करावे, यावर शिक्कामोर्तब केले, पण विनयशील समजण्यात येणार्या उद्धव ठाकरे यांनी विचार करण्यासाठी एक दिवसाचा वेळ मागून घेतला.
राजकारणात पावले झपाट्याने उचलायची असतात आणि निर्णय पटापट घ्यायचे असतात. त्यामुळे शनिवारवर पुढे ढकलण्यात आलेला निर्णय उद्धव ठाकरे यांच्या मार्गात अडथळा बनला. शुक्रवारच्या रात्री पटापट हालचाली झाल्या आणि विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांनी ‘चर्चेचा कंटाळा आला’ असे सांगत भारतीय जनता पक्षाच्या सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासमोर भारतीय जनता पक्षाचे 105, राष्ट्रवादी काँग्रेसचे 54 आणि अपक्ष असे समर्थन देवेंद्र फडणवीस यांना असल्याचे निदर्शनास आणून दिले. राज्यपाल कोश्यारी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे त्या पद्धतीने शिफारस केली आणि राष्ट्रपती राजवट हटवून महाराष्ट्रात नव्या सरकारच्या रचनेसाठी मार्ग मोकळा करून दिला. राजभवन येथे शनिवारी, 23 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी राज्यपाल कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची आणि अजितदादा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची, तसेच गोपनीयतेची शपथ दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे पाच वर्षाचे स्थिर सरकार देतील व राज्याला विकासाच्या मार्गावर नेतील, असा विश्वास व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रात प्रचंड राजकीय उलथापालथ झाली आणि सगळ्याच राजकीय पंडितांचे आडाखे चुकून भलेभले माहीर म्हणविणारे तोंडघशी पडले. महाराष्ट्रात चौदाव्या विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर 2019 रोजी 288 मतदारसंघात मतदान घेण्यात आले आणि 24 ऑक्टोबर 2019 रोजी निकाल लागले. देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वरळीचे नवनिर्वाचित आमदार, युवासेना प्रमुख आदित्य उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले. जनादेश महायुती ला मिळाला असल्याने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार अस्तित्वात येईल अशी अटकळ सर्वांनी बांधली होती, पण कोण खोटे कोण खरे या वादात कालापव्यय होत होता. सर्वाधिक आमदार असलेल्या भारतीय जनता पक्षाने जोपर्यंत शिवसेना सोबत येत नाही तोपर्यंत सरकार बनविणार नाही, अशी संयमी भूमिका घेतली. दुसर्या क्रमांकाचा पक्ष म्हणून शिवसेना विधिमंडळ पक्षनेते एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतली, परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थन पत्र सादर करू शकले नसल्याने सरकार स्थापनेपासून शिवसेना लांब राहिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना राज्यपालांनी पाचारण केले, पण त्यांनी असमर्थता दर्शवताच राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे राष्ट्रपती राजवट संदर्भात शिफारस केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेशी जाण्यापूर्वी त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ बैठक घेतली आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी शिफारस करण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सारीपाटावर सोंगट्या फिरवायला सुरुवात केली आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यासाठी महाविकास आघाडी स्थापन केली. काँग्रेस पक्ष वैचारिक द्रुष्टीने शिवसेनेला स्वीकारू शकत नव्हता. केरळ, कर्नाटक, उत्तरेकडील राज्यांत शिवसेनेबरोबर जाण्यासाठी अनुकूल वातावरण नव्हते.
सोनिया गांधी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोर अटी घातल्या आणि किमान समान कार्यक्रम बनविण्यासाठी बैठकावर बैठका आणि चर्चांवर चर्चा झडल्या. महाराष्ट्रातील चौदाव्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून एक महिना होत आला, तरी राज्यात राजकीय स्थैर्य येत नसल्याने अजित पवार यांनी अखेर भारतीय जनता पक्षाच्या सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. आता देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या शपथविधीनंतर शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषद यशवंतराव चव्हाण केंद्रात घेऊन अजित पवार यांना कुणाचाही पाठिंबा नाही, अजित पवार असे करतील असे वाटले नव्हते, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी व्यक्त केली.
आम्ही तिन्ही पक्ष एकत्र असल्याचे शरद पवार जरी सांगत असले, तरी काँग्रेसने वेगळी पत्रकार परिषद घेतली. आता यापुढे वैधानिक पातळीवर सर्व प्रक्रिया सुरू होतील आणि महाराष्ट्रात स्थिरस्थावर होण्यासाठी देवेंद्र आणि अजितदादा यांची पावले पडतील, अशी खात्री आहे.
देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या नव्या सरकारला मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करताना फडणवीस सरकारने वेळ न दवडता सगळ्या गोष्टींचा योग्यप्रकारे निर्णय घ्यावा, ही अपेक्षा. जय महाराष्ट्र!!
-योगेश त्रिवेदी, मंत्रालय प्रहर