Breaking News

खांदा कॉलनीत कोकण महोत्सवाची धूम

पनवेल : रामप्रहर वृत्त

ओमसाई खांदेश्वर महिला व बाल मंडळाच्या वतीने खांदा खांदेश्वर कोकण महोत्सवाचे आयोजन कॉलनीत करण्यात आले असून, यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळत आहे. त्यामुळे या महोत्सवात लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहे.

नगरसेविका सीता सदानंद पाटील यांनी आठ वर्षांपूर्वी या महोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. सुरुवातीला कोकणापुरता मर्यादित असलेल्या या महोत्सवाला आता मोठे स्वरूप येऊ लागले आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, भाजप नेते बाळासाहेब पाटील, उपमहापौर विक्रांत पाटील, प्रभाग समिती सभापती संजय भोपी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या महोत्सवाला भेट दिली. नगरसेविका सीता पाटील आणि सहकार्‍यांनी त्यांचे स्वागत केले. कोकण महोत्सवाच्या माध्यमातून खांदा वसाहतीचे नाव सर्वदूर पोहोचले आहे, अशा शब्दांत लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या वेळी कौतुक केले, तर आमदार प्रशांत ठाकूर यांनीही हा महोत्सव दर्जेदार असल्याचे सांगितले.

खांदा वसाहतीची लोकसंख्या कमालीची वाढली आहे. येथील रहिवाशांची मनोरंजन, कला आणि सांस्कृतिक गरज भागविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. या वर्षी सेक्टर 8 येथील पोलीस ठाण्यासमोर मैदानावर खांदेश्वर कोकण महोत्सव भरविण्यात आला आहे. या ठिकाणी विविध प्रकारचे पाळणे, खेळणी, घरगुती वापराच्या वस्तू, तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर दररोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत. त्यात पारंपरिक नृत्याविष्काराचे सादरीकरण करण्यात येते. विशेष म्हणजे मराठमोळी लावणीपासून ते गोंधळ, कोळीगीते उपस्थितांच्या पसंतीस उतरत आहेत.

आमदार प्रशांत ठाकूर यांचा नागरी सत्कार

कोकण महोत्सवाचे औचित्य साधून खांदा वसाहतीतील रहिवाशांच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयाची दणदणीत हॅट्ट्रिक साधल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या वेळी रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्काराबद्दल आमदार ठाकूर यांनी खांदा कॉलनीवासीयांचे आभार मानले.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply