पनवेल : बातमीदार
नोव्हेंबर महिना उजाडला की ग्रामीण भागातील युवकांना वेध लागतात ते क्रिकेटचे. या क्रिकेटमधून दरवर्षी करोडो रुपयांची उलाढाल होत असते. त्यामुळे पनवेल तालुक्यातील ग्रामीण क्रिकेटला सध्या सुगीचे दिवस आले आहेत.
क्रिकेट म्हटले की लहानापासून आबालवृद्धांपर्यंत या खेळाची प्रचंड ओढ असते. तालुक्यातील महिला देखील ग्रामीण क्रिकेटच्या प्रेमात पडल्या आहेत. पावसाळा संपल्यावर सार्यांनाच क्रिकेटचे वेध लागतात. त्यामुळे सध्या पनवेल तालुक्यात क्रिकेट खेळण्यासाठी मैदाने तयार करण्याचे काम सुरु आहे. खेळाडू क्रिकेटची खेळपट्टी तयार करण्यात व्यस्त आहेत. पुढील काही दिवसात ग्रामीण भागात लाखो रुपयांच्या क्रिकेट स्पर्धा सुरु होणार असल्याने क्रिकेटच्या सरावाला सुरुवात झाली आहे. दिवसाच्या सामन्यांसह रात्रीचे सामने देखील पनवेल तालुक्यात लोकप्रिय ठरू लागले आहेत. त्यातून खेळाडूना व विजयी संघाला लाखोंची बक्षिसे दिली जातात. त्यामुळेच ग्रामीण भागातील सामन्यांना प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. यामधूनच नवीन उद्योन्मूख क्रिकेटपटूंना संधी मिळणार असल्याचे मत आयोजक व्यक्त करत आहेत. आपल्या ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात क्रिकेट दडलेला असून त्याला संधीची गरज आहे. त्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळला जात आहे.
ग्रामीण क्रिकेट सामन्यांचे लाईव्ह वर्णन टेनिस क्रिकेट व वर्ल्ड टेनिस क्रिकेटद्वारे यु ट्यूबवर केले जाते. त्यामुळे दिवसेंदिवस ग्रामीण क्रिकेटची लोकप्रियता वाढत चालली आहे. नावडे, पारगाव, दापोली, सावळे, दिघोडे, मुर्बी, अजनबी ओवळे, पेठ, तळोजा हे प्रमुख संघ नाईट स्पर्धांचे विजयी संघ मानले जातात. नेरे, विहिघर, चिखले, तळोजा, पेंधर, कळंबोली, आकुर्ली, वलप, चीर्ले आदी गावात लाखो रुपयांच्या बक्षिसे असलेल्या क्रिकेटच्या स्पर्धा भरविल्या जातात. जवळपास आठ फुटी उंच चषक स्पर्धेतील विजयी संघास दिले जातात. पुढच्या आठवड्यापासून सामन्यांना सुरुवात होणार आहे. काही सामन्यांमध्ये चीअर गर्ल देखील आणण्यात येतात. त्यामुळे ग्रामीण सामन्यांची लोकप्रियता वाढत चालली आहे. या सामन्यांमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना देखील आपली क्षमता सिद्ध करण्यास मिळत आहे.
पनवेलच्या ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात क्रिकेटचे टॅलेंट लपलेले आहे. मात्र त्यांना बाहेर काढण्याची गरज असून यासाठी त्या प्रमाणात वातावरण निर्मिती केली जात आहे. नोव्हेंबर महिन्यापासून एप्रिल मे महिन्यापर्यंत करोडो रुपयांची उलाढाल या क्रिकेटच्या सामन्यात होत असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांची गर्दी या सामन्यांना पहावयास मिळत असते. पाच ते आठ हजारोंच्या संख्येने प्रेक्षक सामने पाहण्यासाठी व आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी हजर असतात. ग्रामीण सामने दिवसेंदिवस लोकप्रिय ठरू लागले आहेत. रात्री खेळविल्या जाणार्या सामन्यांतून लाखो रुपयांच्या बक्षिसांची लूट केली जाते. याशिवाय सलग चौकार, षटकार व विकेट घेणार्या स्पर्धकांना हजारोंची बक्षिसे लावली जातात त्यामुळे ग्रामीण भागातील तरुण सध्या क्रिकेटचा सराव करण्यात व्यस्त आहेत. आगामी काळात भारतीय संघात पनवेल तालुक्यातील खेळाडू चमकतील असा विश्वास आयोजक व्यक्त करताना दिसतात.