नवी मुंबई : सिडको वृत्त
सिडको महागृहनिर्माण योजनेतील 9,249 आणि स्वप्नपूर्ती गृहनिर्माण योजनेतील उर्वरित 810 घरांसाठी मंगळवारी (दि. 26) नेरूळ येथील आगरी कोळी भवन येथे सकाळी 10.00 वा. संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीला पर्यवेक्षक म्हणून महाराष्ट्राचे माजी उपलोकायुक्त सुरेश कुमार, राष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्राचे उपसंचालक मोईझ हुसेन अली हे उपस्थित राहणार आहेत.
सिडकोच्या 95 हजार घरांच्या महत्त्वाकांक्षी महागृहनिर्माण योजनेतील 7,905; तर सिडको गृहनिर्माण योजना-2018 मधील उर्वरित 1,344 अशा एकूण 9,249 घरांच्या (सदनिका) गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ सिडकोतर्फे सप्टेंबर 2019मध्ये करण्यात आला होता. या योजनेतील घरे ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत, तर ऑगस्ट 2014 मध्ये सिडकोच्या स्वप्नपूर्ती या लोकप्रिय गृहनिर्माण योजनेतील उर्वरित 810 (सदनिका) घरांच्या योजनेचा प्रारंभ करण्यात आला होता. सदर 810 घरांपैकी 195 घरे ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट, तर 615 घरे ही अल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध आहेत.
यापैकी 810 घरांच्या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 5 ऑक्टोबर 2019, तर 9,249 घरांच्या महागृहनिर्माण योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 18 ऑक्टोबर 2019 अशी होती. या योजनांना मिळालेला उत्तम प्रतिसाद पाहून सदर गृहनिर्माण योजनांकरिता अर्ज करण्याकरिता 5 नोव्हेंबर 2019 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. या योजनांकरिताच्या विविध प्रक्रिया जसे, अर्ज नोंदणी, शुल्क व अनामत रक्कम भरणा इत्यादी ऑनलाइन पद्धतीने पार पडल्या. ऑनलाइन पद्धतीमुळे योजनेशी संबंधित सर्व प्रक्रिया या जलद, सुलभ व अत्यंत पारदर्शकरीत्या पार पडण्यास मदत झाली. या गृहनिर्माण योजनांच्या सोडतीचे थेट (लाइव्ह) प्रक्षेपण वेबकास्टिंगच्या माध्यमातून अर्जदारांना घरबसल्या संकेतस्थळावर पाहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे अर्जदारांना सोडत स्थळी उपस्थित न राहताही सोडतीचा निकाल पाहता येणार आहे, तसेच यशस्वी ठरणार्या अर्जदारांना, त्यांनी नोंदणी करतेवेळी दिलेल्या मोबाइल क्रमांकावरही एसएमएसद्वारे त्याबाबत कळविण्यात येणार आहे. याशिवाय सोडतीचा निकाल सिडकोचे अधिकृत संकेतस्थळावरदेखील उपलब्ध केला जाणार आहे.