Breaking News

सिडको महागृहनिर्माण योजनेची सोडत

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

सिडको महागृहनिर्माण योजनेतील 9,249 आणि स्वप्नपूर्ती गृहनिर्माण योजनेतील उर्वरित 810 घरांसाठीची संगणकीय सोडत मंगळवारी (दि. 26) रोजी नेरूळ येथील आगरी कोळी भवन येथे सकाळी 11.00 वा. यशस्वीरीत्या झाली. सदर सोडतीच्या निकालाचे थेट प्रेक्षपण वेबकास्टिंगच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यामुळे अर्जदारांना घरबसल्या संपूर्ण सोडत पाहण्याची सुविधा प्राप्त झाली होती. सिडकोच्या आजवरच्या गृहनिर्माण योजनांप्रमाणेच दर्जेदार बांधकाम व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही याही गृहनिर्माण योजनांची वैशिष्ट्ये आहेत. दोन्ही गृहनिर्माण योजनांना मिळालेला प्रतिसाद बघता अर्ज करण्याकरिता 5 नोव्हेंबर 2019 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. या दोन्ही गृहनिर्माण योजनांची एकत्रितरीत्या संगणकीय सोडत 26 नोव्हेंबर 2019 रोजी पार पडली. सदर गृहनिर्माण योजनांशी संबंधित सर्व प्रक्रिया उदा. अर्ज नोंदणी, अनामत रक्कम व शुल्क भरणा, सोडत या ऑनलाइन संगणकीय पद्धतीने पार पडल्या. ऑनलाइन प्रक्रियेकरिता लागणारे सॉफ्टवेअर सिडकोतर्फे नेमण्यात आलेल्या प्रोबेटी सॉफ्ट प्रा. लि. या नामांकित कंपनीद्वारे विकसित करण्यात आले होते, तर संपूर्ण प्रक्रिया ही माजी सनदी अधिकारी व उपलोकायुक्त सुरेशकुमार, राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राचे उपमहासंचालक मोईज हुसैन या द्विसदस्यीय पर्यवेक्षण समितीच्या देखरेखीखाली झाली. ऑनलाइन पद्धतीमुळे योजनेशी संबंधित सर्व प्रक्रिया या जलद, सुलभ व अत्यंत पारदर्शकरीत्या पार पडण्यास मदत झाली. संगणकीय सोडत पार पाडतेवेळी पर्यवेक्षण समितीतील दोन मान्यवरांसह उपस्थित अर्जदारांपैकी तीन प्रतिनिधी हे पंच म्हणून उपस्थित होते. यामुळे गृहनिर्माण योजनांची सोडत प्रक्रियाही पारदर्शक पद्धतीने पार पडण्यास मदत झाली. या वेळी यशस्वी ठरलेल्या अर्जदारांपैकी काहींनी आपले मनोगत व्यक्त करताना सिडकोमुळे आपले हक्काच्या घराचे स्वप्न साकार झाले, अशी भावना व्यक्त केली.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply