अलिबाग ः प्रतिनिधी
नाशिक येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या 14 वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत रायगडने गटात अव्वल स्थान मिळवून सुपर लीगमध्ये प्रवेश केला. स्पर्धेत रायगडचा शेवटचा साखळी सामना औरंगाबाद संघाविरुद्ध होता. औरंगाबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या संघाने 71.2 षटकांमध्ये 242 धावा केल्या. औरंगाबादचा आरेझ खान याने 87 चेंडूंत 67 धावा केल्या. रायगडच्या अमय भोसले याने 17.2 षटकांत 60 धावा देऊन पाच बळी घेतले. रायगड संघाची सुरुवात खराब झाली. धावफलक 23 धावांत दोन बाद असे दर्शवत असताना संघनायक ओम म्हात्रे 135 चेंडूंत 58 धावा व निर्जल पाटील 88 चेंडूंत 31 धावा या दोघांनी मिळून तिसर्या गड्यासाठी 168 चेंडूंत 80 धावांची भागीदारी केली. त्यानंतर हे दोघेही फलंदाज पाठोपाठ बाद झाल्याने रायगडचा धावफलक 2 बाद 103 वरून 4 बाद 107 असा झाला. स्मित पाटील व पार्थ पवार यांनी 183 चेंडूंत 86 धावांची भागीदारी करून पहिल्या डावातील आघाडीचे उद्दिष्ट दृष्टिपथात आणले. पार्थने 101 चेंडूंत 37 धावा केल्या. स्मितने उर्वरित फलंदाजांबरोबर 31 व 27 धावांच्या दोन छोट्या-छोट्या भागीदार्या करून पहिल्या डावात आघाडी प्राप्त केली. स्मित हा 130 चेंडूंत 81 धावा काढून नाबाद राहिला. रायगड संघाने 90 षटकांत 9 बाद 253 धावा केल्या व 11 धावांची पहिल्या डावात आघाडी घेतली. अशा प्रकारे रायगड संघाने आपल्या गटामध्ये अव्वल स्थान प्राप्त केले व सुपर लीग स्पर्धेसाठी पात्रता मिळवून इतिहास घडवला.