नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – कोरोनाची सौम्य लक्षणे असणार्या नागरिकांना आता घरीच म्हणजे होम क्वारंटाइन करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असून नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरने यासाठी पुढाकार घेतला आहे. यामध्ये होम क्वारंटाइन रुग्णांना डॉक्टरांतर्फे वीडियो कॉल अथवा फोन कॉलमार्फत वैद्यकीय सल्ला दिला जातो.
कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत अशा रुग्णांना एक मेडिकल किट दिली जाते. यामध्ये 10 दिवसाची औषधे, एन 95 मास्क, सर्जिकल मास्क, डिजिटल थर्मोमीटर, पल्स ऑक्सिमीटर या वैद्यकीय वस्तू दिल्या जातात. या सुविधामध्ये रोज दोन वेळा तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलमधील पॅरा-मेडिकल स्टाफद्वारे ऑनलाइन सल्ला तसेच एक दिवसाआड डॉक्टरांतर्फे वीडियो कॉल अथवा फोन कॉलमार्फत वैद्यकीय सल्ला देण्यात येतो.
तुर्भे, घणसोली, नेरुळ येथील अनेक कोरोनासंक्रमित नागरिक या सुविधेचा फायदा घेत आहेत. क्वारंटाईनबाबत केंद्र सरकारच्या आरोग्य विभागानेही परिपत्रक जारी केले आहे. क्वारंटाइन कसे व्हावे मार्गदर्शक पत्रक सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे, सरकारच्या नियमानुसार होम क्वारंटाइन राहण्यासाठी सांगितल्यावर संबंधित व्यक्तीने हवेशीर बंद खोलीत रहावे. शक्यतो एकटे रहावे, कुटुंब सदस्य असल्यास त्याने एक मीटरपर्यंत अंतर ठेवणे गरजेचे आहे. शक्यतो स्वतंत्र शौचालय वापरावे. घरामध्ये तसेच इमारतीमध्ये फिरण्यावर बंधने असणार आहे. सर्जिकल मास्क वापरावं तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेणे गरजेचे आहे.
होम क्वारंटाइन विषयीचा सल्ला घेण्यासाठी सल्ला घेण्यासाठी 9619454545 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलने केले आहे. ही सेवा सध्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रफळामध्ये उपलब्ध असणार आहे.