उरण : रामप्रहर वृत्त
येथील कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयात ग्रंथालय प्रमाणपत्र प्रशिक्षण देण्यात येत आहे. महाविद्यालयातील महिला विकास कक्ष, व्यवसाय मार्गदर्शन सेल, तसेच रायगड जिल्हा वाचनालय संघ व गोपाळकृष्ण वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने 2 एप्रिल ते 15 जून या कालावधीत शासन मान्यताप्राप्त हे प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्ग विद्यार्थ्यांसाठी घेतले जात आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य के. ए. शामा यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन उत्साहात झाले. या समारंभाचे अध्यक्ष महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापक व्ही. ए. इंदुलकर होते. प्रमुख अतिथी म्हणून रायगड जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. वळवी व सहाय्यक अधिकारी श्री. पवार उपस्थित होते. त्याचप्रमाणे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष नागेश कुलकर्णी, कार्यवाह श्री. भायंरे, गोपाळकृष्ण वाचनालयाच्या अध्यक्षा श्रीमती केळगावकर, अरुण पाठारे, अॅड. वर्षा पाठारे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयातील व्यवसाय मार्गदर्शन कक्षाचे संचालक प्रा. एच. के. जगताप यांनी केले, तर उपस्थितांचे आभार गोपाळकृष्ण वाचनालयाच्या ग्रंथपाल जिजा घरत यांनी मानले. कार्यक्रमास रायगड जिल्हा ग्रंथपाल संघाचे पदाधिकारी, ग्रंथपाल तसेच गोपाळकृष्ण वाचनालयाचे संचालक मंडळ, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील महिला विकास कक्षाच्या संचालिका अनुपमा कांबळे यांनी मेहनत घेतली.