Breaking News

खांदा वसाहतीत आणखी एक उद्यान होणार

सभापती संजय भोपी यांचे सिडकोला मागणीचे पत्र

पनवेल : प्रतिनिधी

खांदा वसाहतीत काही उद्याने आहेत, मात्र ती अपुरी पडत आहेत. येथील रहिवाशांची गैरसोय दूर व्हावी याकरिता सेक्टर 8मधील उद्यानाकरिता राखीव असलेल्या भूखंडाचा विकास करावा, अशी मागणी प्रभाग समितीचे सभापती संजय भोपी यांनी सिडकोकडे केली आहे. त्यांनी याबाबत कार्यकारी अभियंत्याला निवेदन दिले आहे. खांदा वसाहतीत सेक्टर 8 येथे सिडकोच्या इमारती आहेत. तिथे विशेष करून ए आणि बी टाईपची घरे आहेत. त्या ठिकाणी अल्पउत्पादन गटातील कुटुंब राहतात, मात्र या परिसरात मुलांना खेळण्यासाठी जागेचा अभाव आहे, तसेच रहिवाशांना विरंगुळ्याकरिता उद्यानाचा अभाव आहे. खांदेश्वर तलावासमोर आणि बाजूला उद्यान आहेत, परंतु ते अपुरे पडत आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. परिणामी ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांची गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर ज्या ठिकाणी या कारणाकरिता आरक्षित भूखंड आहेत. त्याचा विकास व्हावा, अशी मागणी स्थानिक नगरसेवक म्हणून संजय भोपी यांनी केली आहे. विशेष करून महात्मा स्कूलच्या बाजूला क्रमांक पाच हा भूखंड गार्डनसाठी राखीव आहे. त्याचा विकास सिडकोने केलेला नाही. परिणामी त्याचा वापर स्थानिक रहिवाशांना करता येत नाही. त्यामुळे या भूखंडावर सिडकोने उद्यान विकसित करावे, अशा मागणीचे पत्र भोपी यांनी सिडकोच्या नवीन पनवेल कार्यालयात कार्यकारी अभियंत्यांना दिले. या ठिकाणी सर्व सोयीसुविधा असाव्यात, जेणेकरून त्याचा फायदा येथील रहिवाशांना होईल, असे त्या पत्रात म्हटले आहे.

Check Also

उरणमधील ‘उबाठा’, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब …

Leave a Reply