विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका, संरक्षण भिंत उभारण्याची मागणी
पाली : प्रतिनिधी
सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा गावातील मराठी शाळा व अंगणवाडीजवळ असलेली विद्युत डीपी (रोहित्र) चोहूबाजुने उघडी असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या डीपी भोवती स्वखर्चाने संरक्षक भिंत उभी करण्यासाठी आवश्यक ती परवानगी द्यावी, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते जयवंत (आबा) बहाडकर यांनी महावितरणकडे निवेदनाद्वारे केली आहे. मराठी शाळेजवळ असलेल्या या डीपीच्या परिसरात विशेषतः विद्यार्थी खेळण्यासाठी येतात, शिवाय नागरिक व जनावरे यांचादेखील मुक्तसंचार असतो. या डीपी भोवती कचरा व गवत वाढले आहे. अनेकदा जिवंत विद्युत वाहिन्या व डीपी लगत शॉर्ट सर्किट होऊन ठिणग्या पडतात. त्यामुळे येथील गवत पेट घेऊन आग भडकण्याची दाट शक्यता आहे. वास्तविक संभाव्य धोका लक्षात घेता महावितरणने याठिकाणी योग्य ती व जलद उपाययोजना करणे गरजेचे होते, मात्र महावितरणचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या डीपी भोवती स्वखर्चाने संरक्षक भिंत उभारण्यासाठी परवानगी द्यावी, या मागणीचे निवेदन जयवंत (आबा) बहाडकर यांनी महावितरणला दिले आहे. दरम्यान, सदर डीपी भोवती संरक्षण भिंत अथवा तारेचे कंपाउंड उभारण्यासाठी लवकरच परवानगी दिली जाईल, असे आश्वासन महावितरणच्या अधिकार्यांनी बहाडकर यांना या वेळी दिले.