अलिबाग : प्रतिनिधी
पंजाब नॅशनल बँकेला कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून फरार झालेला डायमंड किंग नीरव मोदी याचा अलिबाग तालुक्यातील किहीम येथील बंगला शुक्रवारी (दि. 8) नियंत्रित स्फोटाने जमीनदोस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु हा प्रयत्न पूर्णपणे यशस्वी होऊ शकला नाही. स्फोट घडवूनदेखील बंगला पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ शकला नाही. या बंगल्याचा काही भाग कलंडला, परंतु पूर्णपणे पडला नाही. आता हा बंगला यंत्रांनी पाडण्यात येणार आहे. नीरव मोदी याने किहीम येथे शासकीय जागेत 30 हजार चौरस फुटांचा बंगला बांधला होता. नीरव परदेशात फरार झाल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्याचा बंगला ताब्यात घेतला. त्यातील किमती वस्तू येथून नेण्यात आल्या. जिल्हाधिकार्यांनी हा बंगला अनधिकृत ठरवल्यानंतर त्यावर कारवाई करण्यासाठी तो रायगड जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आला. त्यानुसार बंगला पाडयाची तयारी सुरू झाली.
नीरव मोदीच्या बंगल्यावर 17 डिसेंबर 2018 रोजी जिल्हा प्रशासनाकडून कारवाई करण्यास सुरुवात झाली होती. सुरुवातीला जेसीबी पोकलेनच्या सहाय्याने हा बंगला पाडण्याचा प्रयत्न झाला, परंतु तो असफल ठरला. त्यानंतर लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील अभियंत्यांना पाचारण करण्यात आले होते. त्यांनी पाहणी करून नियंत्रित स्फोटाने हे बांधकाम हटवावे असा अभिप्राय दिल्यानंतर तसा निर्णय घेण्यात आला. बंगला नियंत्रित स्फोटाने पाडण्यासाठी बंगल्याच्या इमारतीला सुरूंग लावण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. गेले आठवडाभर 50 कर्मचारी त्यासाठी काम करीत होते. खांबांना छिद्र पाडून त्यामध्ये स्फोटके भरण्यात आली. हा बंगला 8 मार्च रोजी स्फोटाद्वारे उडविण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे, उपविभागीय अधिकारी शारदा पोवार, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या उपस्थित स्फोट घडविण्यात आला.
या स्फोटात बंगल्याचा काही भाग खिळखिळा झाला, परंतु बंगला पूर्णपणे उद्ध्वस्त झाला नाही. खांब वाकले, मात्र त्याला लागून असलेले बांधकाम पडले नाही. त्यामुळे आता यंत्रांच्या सहायाने हा बंगला पूर्णपणे पाडण्यात येणार आहे.
- पत्रकार जखमी
स्फोटावेळी बंगल्याच्या सिमेंट काँक्रीटचे अवशेष सुमारे 100 मीटर दूर उडाले. त्यामुळे बंगला पाडण्याचे चित्रिकरण करण्यासाठी आलेले वाहिन्यांचे काही पत्रकार जखमी झाले, तसेच स्थानिक लोकही जखमी झाले. सुदैवाने कुणालाही मोठी दुखापत झाली नाही.
नीरव मोदी याच्या बंगला पाडकामाद्वारे अनधिकृत बांधकाम करणार्या इतर लोकांसाठी हा एक इशारा आहे. सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून ज्यांनी बांधकामे केली आहेत, त्यांच्याविरुद्धची मोहीम सुरूच राहणार आहे. काही लोकांनी न्यायालयातून स्थगिती मिळवली आहे. न्यायालयाचे आदेश येताच सर्व अनधिकृत बांधकामे पाडली जातील.
डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी, रायगड