पाली : प्रतिनिधी
सुधागड तालुक्याला गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपले आहे. सोमवारी (दि. 29) अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे वाकण-पाली-खोपोली मार्गावरील पाली व जांभुळपाडा पुलाला पुराच्या पाण्याने वेढा दिला होता. दुसर्या दिवशी मंगळवारी (दि. 30) सकाळी 8वाजल्यापासून या पुलावरील पाणी वाढल्यामुळे खबरदारी म्हणून पोलीस प्रशासनाने दोन्ही बाजूची वाहतूक बंद केली होती. परिणामी या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले.
पावसाचा जोर दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना व नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वाकण -पाली -खोपोली मार्गावरील बलाप व वजरोली फाट्यावरील वळणावर तीन फुटाहून अधिक पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे खोळंबली होती. वाहतूक व दळणवळणाची सर्व साधने बंद असल्याने रुग्ण, विद्यार्थी, कामगार वर्गाला मोठा फटका बसत असल्याचे दिसून आले. शेती पाण्यात बुडाल्याने शेतकर्यावर दुबार पेरणीचे संकट आले आहे. नागोठणे व पाली बस स्थानक पाण्यात बुडाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले.
पावसाचा जोर कायम वाढतच असल्यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये, याकरिता तालुका प्रशासनाने पाली व जांभुळपाडा पुलावर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
– पालीतील रस्त्यांवर पाणी
मुसळधार पावसामुळे पालीतील नाले व गटारे तुडूंब भरून वाहत होते. येथील आगर आळी, सोनार आळी, भोईआळी, बल्लाळेश्वर नगर आदी ठिकाणी रस्त्यावर पाणी आले. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
पाली व जांभूळपाडा येथील आंबा नदी पुलांवरुन पुराचे पाणी जात असल्याने दोन्ही बाजूची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कुणीही कामाशिवाय बाहेर पडू नये.
-वैशाली काकडे, नायब तहसीलदार, पाली सुधागड