माणगाव : प्रतिनिधी
परतीच्या पावसाने माणगाव तालुक्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून पीकविमा व नुकसानभरपाईची रक्कम शेतकर्याच्या थेट खात्यात जमा करावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करीत आहेत. दरम्यान, नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे.
माणगाव तालुक्यात यंदा 12295 हेक्टरवर भातपीक लागवड करण्यात आली होती. पीकही उत्तम आले होते, मात्र भातपीक कापणीला आले असताना सलग 15 दिवस पाऊस पडला. त्यात काही शेतांतील पीक पाण्याखाली गेले, तर अनेकांच्या शेताचे बांध फुटून पीक वाहून गेले. काही ठिकाणी शेतात पाणी तुंबून भातपीक कुजले. भातपिकाबरोबरच वरकस जमिनीवरील नाचणी, वरी या पिकांचीही वाताहत झाली. त्यामुळे माणगाव तालुक्यातील शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला आहे.
माणगाव तालुक्यातील 187 गावांतील सुमारे 1195.35 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे परतीच्या पावसाने नुकसान झाले असून, त्याचे पंचनामे करण्याचे काम सुरू झाले आहे. आतापर्यंत 76 गावांतील 346.92 हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. उर्वरित पंचनामे करण्याचे काम सुरू असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
माणगाव तालुक्यातील भातशेती नुकसानीचे तातडीने पंचनामे करून बाधित शेतकर्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई द्यावी.
-ज्ञानदेव पवार, अध्यक्ष, माणगाव तालुका शेतकरी संघटना
तालुक्यात नुकसानीचे क्षेत्रही जास्त असल्यामुळे पंचनामे करण्याला विलंब लागत आहे, मात्र पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर करा, अशा सूचना संबंधित कर्मचार्यांना दिल्या आहेत.
-रवींद्र पवार, कृषी अधिकारी, माणगाव