कर्जत : प्रतिनिधी
तौत्के चक्रीवादळात कर्जत तालुक्यामधील पेठ गावातील आदिवासी भगिनी नंदा डामसे यांच्या घरावरील पत्रे उडून गेले होते. घराचे तसेच आतील सामानाचे प्रचंड नुकसान झाले होते. त्याची माहिती मिळताच रा.स्व.संघ जनकल्याण समितीच्या कार्यकर्त्यांनी नंदा डामसे यांना घराच्या पुनर्बांधणीसाठी तातडीने मदत केली. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वीच डामसे यांच्या घरावर छप्पर बसले असून कुटुंबियांना मोठा आधार मिळाला आहे.रा.स्व.संघ जनकल्याण समितीच्या वतीने वनवासी पाड्यांवर आरोग्यरक्षक योजना राबवली जाते. पेठ गावात नंदा डामसे या आरोग्यरक्षिका म्हणून काम पाहतात. तौत्के चक्रीवादळात घराची पडझड झाल्याने त्या हवालदिल झाल्या होत्या. शासकीय मदतही त्यांच्यापर्यंत पोहोचली नव्हती. जनकल्याण समितीचे कार्यकर्ते भगवान भगत यांना डामसे यांच्या घराच्या नुकसानीची माहिती मिळाली. डामसे यांनीही जनकल्याण समितीकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली. त्यानंतर भगत यांनी लगेच जनकल्याण समितीचे जिल्हा कार्यवाह नितीन भावे यांच्याशी संपर्क साधला. भावे यांनी जिल्हा अध्यक्ष अरुण दाते, विभाग कार्यवाह रविकिरण काळे, कोकण संभाग कार्यवाह अविनाश धाट, सहकार्यवाह सुहास जोशी आणि महाराष्ट्र प्रांताचे कोषाध्यक्ष प्रदीप पराडकर यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून त्यांना परिस्थितीची जाणीव करून दिले. समितीच्या प्रांत कार्यकारिणी बैठकीमध्ये नंदा डामसे यांच्या घराच्या पुनर्बांधणीसाठी सर्वतोपरी मदत करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर लगेचच घरासाठी लागणारे पत्रे, लोखंडी पाईप, सिमेंट यांची खरेदी करून डामसे यांच्या घरावर छप्पर बसवण्यात आले. जनकल्याण समितीच्या पदाधिकार्यांनी तातडीने मदत केल्याबद्दल नंदा डामसे यांनी जनकल्याण समितीचे आभार मानले.