मच्छीमार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष मनोहर बैले यांचा आंदोलनाचा इशारा
मुरूड : प्रतिनिधी
राज्य शासनाकडून मच्छीमारांना डिझेल परताव्याची रक्कम अदा केलेली नाही. त्यामुळे मच्छीमार संतप्त झाले आहेत. डिझेल परताव्याची आमच्या हक्काची रक्कम तातडीने मिळावी, अन्यथा मोठे जनआंदोलन छेडावे लागेल, असा इशारा रायगड जिल्हा मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले यांनी दिला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी सागर कन्या मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर मकू उपस्थित होते. खोल समुद्रात मासळी मिळत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून मासेमारी नौका किनार्यावर उभ्या आहेत. परिणामी मासेमारी व्यवसायावर अवलंबून असणार्या मच्छीमारांची स्थिती बिकट झाली आहे. त्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकर्यांना शासनाने तातडीने नुकसानभरपाई देऊन दिलासा दिला आहे, मात्र समुद्रात दिवसेंदिवस मत्स्य दुष्काळ पडत असूनही राज्य शासन मच्छीमारांना नुकसानभरपाई देत नाही. रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांना डिझेल परताव्याची रक्कम अदा केलेली नाही.
राज्य शासनाने किमान आमच्या हक्काची डिझेल परताव्याची रक्कम अदा करावी, अन्यथा आम्हाला मोठे आंदोलन करावे लागेल.
-मनोहर बैले, उपाध्यक्ष, रायगड जिल्हा मच्छीमार संघ