जगातील सर्वात मोठा लोकशाहीप्रधान देश म्हणून ओळखल्या जाणार्या भारतात लोकसभा निवडणुकीचा महासंग्राम होऊ घातला आहे. 17व्या लोकसभेसाठी गुरुवारपासून मतदानप्रक्रिया सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग, तसेच प्रशासन व पोलीस यंत्रणा यांनी तयारी पूर्ण केली आहे. आता देशाचे जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावायचा आहे.
आपल्या देशात विविध सण-उत्सव वर्षभर साजरे होत असतात. लोक यामध्ये कुटुंबासमावेत भक्तिभाव व हर्षोल्हासाने सक्रिय सहभाग घेतात. अशाचप्रकारे जनतेच्या सहभागाने यशस्वी होणारा एक अनोखा उत्सव म्हणजे लोकशाहीचा उत्सव अर्थात निवडणुका. सणवार, उत्सवांप्रमाणेच सातत्याने वेगवेगळ्या निवडणुका खंडप्रिय असलेल्या भारतात होत असतात. यात देशाचे भवितव्य ठरविणार्या लोकसभा निवडणुकीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची धुरा कुणाच्या हातात द्यायची, सक्षमपणे नेतृत्व कोण करू शकेल यांसारख्या प्रश्नांची चर्चा यानिमित्ताने होत असते. अशा वेळी नुसती चर्चा करून चालणार नाही, तर आपले जे काही मत असेल, ते व्यक्त करण्याबरोबरच प्रत्यक्ष मतदानयंत्रात समाविष्ट करून लोकशाही बळकटीकरणासाठी प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे. आपण पाहतो स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच महापालिका, नगर परिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मतदान होत असते. त्या तुलनेत लोकसभा, विधानसभा अशा मोठ्या निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का कमी दिसून येतो. वास्तविक, निवडणूक मग ती कोणतीही असो मतदान करणे हे आवश्यक आहे. आपल्याला जर नागरी व मूलभूत सोयी-सुविधा हव्या असतील, तर मतदान करायलाच हवे. बर्याचदा काही लोक मतदानाला मिळालेली सुटी इतरत्र फिरण्यात घालवतात. विशेषत: उच्चभ्रू मंडळींना वाटत असते की कोण जिंकला अन् कोण हरला तरी आमच्या जीवनात काही फरक पडणार नाही. खरे तर तो त्यांचा गैरसमज असतो. एका विशिष्ट पातळीवर प्रत्येकाचा या ना त्या कारणाने राजकीय नेत्यांशी संबंध येतोच. त्यांच्यापुढे जाताना आपण त्याला सोडाच, पण कुणाला तरी मतदान केले आहे का हे आधी स्वत:ला विचारले पाहिजे. लोकशाहीत 18 वर्षे पूर्ण असलेल्या प्रत्येकाला मतदानाचा हक्क आहे. तो बजावता यावा यासाठी सातत्याने निवडणूक आयोगाकडून विविध कार्यक्रम आखले जात असतात. मतदाराला मतदान करणे सुलभ व्हावे या दृष्टीने नियोजन केले जात असते, मात्र नंतर बघू म्हणून काही जण हयगय करतात. मग परिपूर्ण माहितीअभावी त्यांचे नाव मतदार यादीतून वगळले गेल्यास आरडाओरड सुरू असते. असे काही होऊ नये म्हणून वेळीच निवडणूक आयोग वा प्रशासनाच्या जवळच्या संबंधित कार्यालयात जाऊन चौकशी करता येऊ शकते. लोकशाही अधिक बळकट व्हावी यासाठी मतदान करणे देशाचे सुजाण नागरिक म्हणून हक्क नव्हे; तर कर्तव्य आहे. मतदानप्रक्रिया सक्तीची करायला हवी, असा सूर अधूनमधून आळवला जातो. त्यात तथ्य आहे, पण तशी वेळ येऊनच का द्यायची बरे. मतदान हेही एक महत्त्वपूर्ण दान आहे. ते वाया घालवू नका. मतदान करून लोकशाहीचा उत्सव साजरा करू या!