ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारांचे भवितव्य पणास
कर्जत : बातमीदार
रायगड जिल्ह्यातील महत्त्वाच्या असलेल्या नेरळ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 72 टक्के मतदान झाले आहे. किरकोळ वाद वगळता मतदानप्रक्रिया शांततेत पार पडली. यानिमित्ताने 48 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. 3 सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार असून, गणपती बाप्पा कुणाला पावणार हे त्याच दिवशी समजणार आहे.
शनिवारी (दि. 31) सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने मतदानाचा टक्का दुपारपर्यंत कमी होता. दुपारी पावसाने काही काळ विश्रांती घेतली. त्या काळात मतदानाचा टक्का वाढला, मात्र चार वाजल्यापासून पाऊस पुन्हा बरसू लागला आणि उमेदवारांची धाकधूक वाढली. मतदान संपेपर्यंत पावसाचा जोर कमी झाला होता. त्या वेळी प्रभाग दोन आणि सहामध्ये मोठ्या संख्येने मतदारांनी रांगा लावल्याने साडेपाचनंतरही तेथे मतदानप्रक्रिया चालू होती. सर्वात कमी मतदान प्रभाग पाचमध्ये झाले असून, तेथे 64.27 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, तर सर्वात जास्त मतदान आदिवासी समाजाचे मतदार असलेल्या प्रभाग एकमध्ये 85.84 टक्के इतके झाले. नेरळ ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या एकूण 13899 पैकी 10028मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, त्याची टक्केवारी 72 इतकी आहे. या निवडणुकीत थेट सरपंचपदासाठी 4 आणि 17 जागांसाठी सहा प्रभागांतून 44 उमेदवारांनी मतदारांना कौल लावला. ऐन गणेशोत्सवात 3 सप्टेंबर रोजी कर्जत तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे. त्यामुळे कुणाच्या अंगावर विजयाचा गुलाल उडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.