
कर्जत : प्रतिनिधी
तालुक्यातील कळंब प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका मागील एक महिन्यापासून बंद असून त्याचा परिणाम येथील रुग्ण सेवेवर होत आहे. त्याचप्रमाणे येथे पुरेशा प्रमाणात औषधसाठा नसल्यामुळे रुग्णांना खासगी दुकानातून औषधे घ्यावी लागत आहेत. या आरोग्य केंद्रात औषधसाठा तातडीने उपलब्ध करून द्यावा तसेच रुग्णवाहिका सेवा सुरू करावी, अशी मागणी कळंब परिसरातील ग्रामस्थांमधून होत आहे.
कळंब प्राथमिक आरोग्य केंद्रातील बाह्यरूग्ण विभागात दररोज सरासरी 100 रुग्ण उपचारासाठी येतात, मात्र मागणीप्रमाणे आरोग्य केंद्र व उपकेंद्रात औषध पुरवठा होत नाही. शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णाला खासगी दुकानात औषधे घेण्यासाठी चिठ्ठी दिली जात आहे. कळंब आरोग्य केंद्रांतर्गत पोशिर, मानिवली, बोरगाव, ओलमन आणि पाषाणे ही उपकेंद्रे चालविली जातात. सुमारे 23,077 लोकसंख्या असलेल्या या परिसरात बहुसंख्य भाग हा आदिवासी वस्तीचा असल्याने या दुर्गम डोंगराळ भागातील आजारी व्यक्तीस तसेच गरोदर महिलांना प्रसूतीसाठी कळंब आरोग्य केंद्राशिवाय अन्य पर्याय नाही. जंगल परिसरात असलेल्या वाड्यावस्तीमधून सर्पदंश, विंचू दंशाचे रुग्ण उपचारासाठी येत असतात. याशिवाय साथीच्या आजाराचे प्रमाणही जास्त असल्याने या केंद्रात उपचारासाठी येणार्या रुग्णांची संख्या मोठी असते, मात्र सध्या औषधांचा साठा मुबलक प्रमाणात नसल्याने काही वेळेस रुग्णांना बाहेरून औषधे विकत आणावी लागत आहेत.
या आरोग्य केंद्रातून मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबर महिन्यासाठी फक्त पन्नास कफ सिरपच्या बाटल्या उपलब्ध झाल्या आहेत. त्या रुग्णांच्या प्रमाणात अत्यल्प असल्याने सर्दी-खोकल्याच्या अनेक रुग्णांना बाहेरून औषधे विकत घ्यावी लागत आहेत. रात्री-अपरात्री या आरोग्य केंद्रात उपचारासाठी गेलेल्या रुग्णावर योग्य औषधोपचार न केल्यास नातेवाईक आणि उपस्थित डॉक्टर, आरोग्य कर्मचार्यांत वादविवादाचे प्रसंगही घडत आहेत. औषधांची मागणी व नोंदी ऑनलाइन होऊनही आरोग्य विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. कळंब परिसरात मोठ्या संख्येने दुर्गम भागातून लोक उपचारासाठी येतात. त्यासाठी पुरेशा प्रमाणात औषधांचा साठा असणे आवश्यक आहे.
टायर खराब झाल्याने आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका मागील महिनाभरापासून बंद अवस्थेत आहे. यासंदर्भात संबंधित विभागास कळवले असून नवीन टायरची मागणी केली आहे. टायर उपलब्ध झाल्यास लवकरच रुग्णवाहिका सेवा सुरळीत होईल.
-गणेश मानकामे, रुग्णवाहिका चालक, प्राथमिक आरोग्य केंद्र, कळंब
कळंब प्राथमिक आरोग्य केंद्राकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. मागील महिनाभरापासून येथील रुग्णवाहिका टायर नसल्याने बंद अवस्थेत आहे. परिणामी प्रसूतीसाठी येथे येणार्या महिलांना नेण्या-आणण्यासाठी खासगी वाहनाचा वापर करावा लागत आहे.
-राहुल बदे, ग्रामस्थ, ता. कर्जत