![](https://ramprahar.com/wp-content/uploads/2019/12/charch-2-1024x783.jpg)
प्राचीन काळात व्यापारी बंदर म्हणून प्रसिध्दीस असलेल्या चौलमध्ये पोर्तुगीजांनी सन 1505मध्ये व्यापारानिमित्त प्रवेश केला. चौल व रेवदंडासह कोर्लई भागावर पोर्तुगीजांचे वर्चस्व होते. कोर्लई किल्ला निजामाच्या ताब्यातून हिसकावून घेत सन 1594मध्ये कोर्लई किल्ला काबीज केला. कुंडलिका समुद्र खाडीत प्रवेश करणार्या जहाजावर लक्ष ठेवणे कोर्लईच्या टेकडी किल्लावरून सोपे जात असे. या सगळयात पोर्तुगीजांची वस्ती कोर्लई भागात होऊ लागली.पुढे स्थानिक व पोर्तुगीज यांच्यातील संवादासाठी नॉ लिंग भाषेची निर्मिती झाली. या भाषेला कोर्लई क्रिओल पोर्तुगीज असेही म्हटले जाते. सध्या कोर्लई गावाच्या एका बाजूस टेकडीच्या छायेत ख्रिश्चन बांधवांची लोकवस्ती आहे. कोर्लई येथे ख्रिश्चन बांधवांचे प्रार्थनास्थळ माऊंट कार्मेल चर्च दिमाखाने उभे आहे. कोर्लईमधील ख्रिश्चन बांधवांचे प्रार्थनास्थळ असलेल माऊंट कार्मेल चर्च सन 1713मध्ये बांधले गेल्याचे लिखीत आहे. 150 वर्षे चौलमध्ये सत्ता उपभोगल्यानंतर मराठ्यांशी झालेल्या युध्दात पराभव पत्करावा लागल्याने पोर्तुगीज व मराठे यांच्या तहानुसार सन 1740मध्ये पोर्तुगीज येथून निघून गेले. 1713 साली बांधले गेलेले कोर्लई येथील माऊंट
कार्मेल चर्च हे पोर्तुगीज काळातील असल्याचे स्पष्ट होते. अलिबागपासून 22 किमी व रेवदंडा येथून चार किमी अंतरावर मुरूड तालुक्यात येत असलेले कोर्लई या ख्रिश्चन पाड्याच्या शेजारी 300 वर्षांपूर्वी बांधलेले व पोर्तुगीज काळाची आठवण देणारे माऊंट कार्मेल चर्च आहे. येथे रोजारिओ, डिसुजा, परेरा, मार्तीस, रॉड्रिक्स, वेगास, रोचा, पेना व गोम्स ही प्रमुख घराणी तसेच गोवा व दिव-दमणमधून आलेली काही कुटुंबे वास्तव्यात आहेत. कोर्लईमधील ख्रिश्चन बांधव प्रामुख्याने शेती, भाजीपाला तसेच मासेमारी हा व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात. काळाच्या ओघात कोर्लईमधील ख्रिश्चन पाड्यातील ख्रिश्चन बांधव मुंबई, पुणे, ठाणे, अलिबाग, रोहा, पनवेल, उरण आदी भागांत कामानिमित्त स्थलांतरित झाले, मात्र कोर्लईच्या माऊंट कार्मेल चर्च व कोर्लई ख्रिश्चन पाडा यांच्याशी ॠणानुबंध ठेवून आहेत. कोर्लई माऊंट कार्मेल चर्चमध्ये ख्रिश्चन बांधवांचे पारपंरिक रितीरिवाज, सण, उत्सव साजरे केले जातात. यामध्ये इस्टर, नवीन वर्ष, गुड फ्रायडे, माय दे देऊस उत्सव हे सण ख्रिश्चन बांधवांच्या सहभागाने साजरे केले जातात. या विविध सणांनिमित्त काम व नोकरी व्यवसायनिमित्त विखुरलेले ख्रिस्ती बांधव कोर्लई येथे नित्याने एकत्रित येतात. या वार्षिक सण उत्सवास येथे शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व पारंपरिक कार्यक्रमसुध्दा साजरे केले जातात. यासाठी होली रोझरी, होली क्रॉस, माऊंट मेरी, कार्मेल माता, संत जोजफ असे विभाग पाडण्यात येऊन त्यामध्ये स्थानिक ख्रिश्चन पाड्यातील बांधवांचा प्रत्येक विभागास दोघांची निवड केली जाऊन त्या कार्याची वेगवेगळी जबाबदारी सोपविण्यात येते. तसेच माऊंट कार्मेल चर्चमध्ये सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी साडेसहाला व रविवार सकाळी सात वाजता प्रार्थना घेतली जाते. या वेळी स्थानिक ख्रिश्चन बांधव उपस्थित असतात. विशेष म्हणजे येथील धार्मिक विधी मराठी भाषेतच केले जातात. येत्या 25 डिसेंबरपासून कोर्लई येथे माऊंट चर्चमध्ये नाताळ सण व नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहाने ख्रिश्चन बांधव करीत आहेत. नाताळ सणाच्या निमित्ताने नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने विखुरलेले ख्र्रिश्चन समाजबांधव कोर्लई येथे एकत्रित येतात. यानिमित्त कोर्लई माऊंट कार्मेल चर्चला रंगरंगोटी करण्यात आली असून, विशेष प्रार्थना व पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षी पारंपरिक ख्रिस्तांच्या जन्माचे गोठे उभारण्यासाठी पर्यावरण हा विषय ठेवण्यात आला आहे. वृक्षतोड, अतिवृष्टी आणि पर्यावरणाचा होत असलेला र्हास आदी विषयांवर या ख्रिस्त जन्माच्या गोठेमधून पर्यावरण जनजागृतीचा संदेश युवावर्गाला स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येत आहे. त्यानिमित्त 26 आणि 27 डिसेंबर रोजी रायगड डिनरीमार्फत भव्यदिव्य युवा महोत्सव साजरा केला जाणार असून, या महोत्सवासाठी नव्या क्षितिजाकडे हा विषय अर्थात पर्यावरण घेण्यात आल्याचे कोर्लई माऊंट कार्मेल चर्चचे फादर जो. बार्जेस यांनी सांगितले.
-महेंद्र खैरे, रेवदंडा