Breaking News

महाराष्ट्र-हैदराबाद सामना अनिर्णीत

स्वप्नील फुलपगारचे झुंजार त्रिशतक

नागोठणे, अलिबाग : प्रतिनिधी
सी. के. नायडू करंडक क्रिकेट स्पर्धेंतर्गत रिलायन्स कंपनीच्या नागोठणे येथील मैदानावर खेळला गेलेला महाराष्ट्र आणि हैदराबाद संघांमधील चार दिवसीय साखळी सामना अनिर्णीत अवस्थेत संपला. पुण्याच्या स्वप्नील फुलपगार या फलंदाजाने झुंजार त्रिशतकी (328 धावा) खेळी केल्याने महाराष्ट्राने हैदराबादची 653 धावांची आघाडी मोडत 7 बाद 656 धावा केल्या. त्यामुळे महाराष्ट्राला तीन, तर हैदराबाद संघाला एक गुण देण्यात आला.
पुण्याचाच 142 धावांची खेळी केलेला क्षीरसागर आणि स्वप्नील फुलपगार यांची 326 धावांची भरभक्कम भागीदारी या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले. संपूर्ण भारतात होत असलेल्या सी. के. नायडू करंडक क्रिकेट स्पर्धेत या मोसमात सहाशेपेक्षा सर्वांत जास्त काढण्यात आलेल्या धावांचा नागोठणे रिलायन्सच्या मैदानावर यशस्वी पाठलाग करण्यात महाराष्ट्राला यश मिळाले. महाराष्ट्राच्या नावे हा विक्रम नोंदविण्यात आला आहे. आतापर्यंत रिलायन्स मैदानावर द्विशतकाची नोंद होती, पण फुलपगारने बुधवारी (दि. 8) त्रिशतक नोंदविल्याने येथील द्विशतकाचा विक्रमही मोडीत निघाला.
महाराष्ट्राच्या डावाची सुरुवात डळमळीत झाली होती, परंतु स्वप्नील व यश यांनी झुंजार फलंदाजी करीत महाराष्ट्राचा डाव सावरला. यश 142 धावा करून बाद झाला. त्याने 404 मिनिटे फलंदाजी करून 288 चेेंडूंचा सामना केला. त्याच्या खेळीत 18 चौकारांचा समावेश होता, तर स्वप्नील 642 मिनिटे खेळपट्टीवर होता. त्याने दोन उत्तुंग षटकार  व 41 चौकार मारले. हे दोघे बाद झाल्यानंतर सिद्धेश वारघंट (60 धावा),  रणजित निकम (42 धावा) व आकाश जाधव (नाबाद 30) यांनी जिद्दीने फलंदाजी करून महाराष्ट्राला पहिल्या डावात आघाडी मिळवून दिली.
दरम्यान, या सामन्यात सर्वोत्तम कामगिरी केल्याची महाराष्ट्र संघटनेने दखल घेतली असून, यश क्षीरसागर या खेळाडूला येथे थांबविण्यास सूचित करण्यात आले आहे. 11 जानेवारीपासून याच मैदानावर महाराष्ट्र आणि झारखंड या दोन संघांमध्ये रणजी सामना सुरू होत असल्याने यश महाराष्ट्राकडून ‘रणजी’त पदार्पण करण्याची संधी उपलब्ध होईल, असे बोलले जात आहे.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply