पनवेल : प्रतिनिधी
पनवेल रेल्वे सुरक्षा बल आणि सीआयबीने संयुक्त कारवाई करीत शुक्रवारी (दि. 2) बेलापूरमधून अवैध ई-तिकीट विक्री करणार्या व्यक्तीला पकडून तीन लाख 47 हजार रुपये किमतींची 227 तिकिटे जप्त केली आहे. यामुळे रेल्वेची अवैध तिकीट विक्री करणार्यांना मोठा झटका बसला आहे.
रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकार्यांना नवी मुंबई परिसरात अवैध ई-तिकीट विक्री केली जात असल्याची खबर मिळाली होती. शुक्रवारी सीआयबी आणि रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ निरीक्षक जसबीर राणा यांनी टिम बनवून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शॉप नंबर 2 मातोश्री निवास प्लॉट नंबर 367 सेक्टर 20 बेलापूर येथे रात्री 12 वाजता धाड टाकली. त्याठिकाणी मनोहर मेश्राम (वय 28, रा. शॉप नंबर 2, मातोश्री निवास, प्लॉट नंबर बी – 67, सेक्टर 20 बेलापूर) हा अवैध ई-तिकीटे बनवून गरजूंना जास्त किमतीला विकत असल्याचे आढळून आले.
रेल्वेचा कोणताही तिकीट विक्रीचा परवाना नसताना मनोहर मेश्राम याचेकडे या वेळी 80 आरक्षित ई-तिकीटे कीमत 152006.50 तसेच 147 नग वापरलेली आरक्षित ई- तिकीटे कीमत 191068.7 रुपये, अशी एकूण 227 नग तिकीटे ज्यांची किमत 343075.2 रुपये आहे. तिकीटे काढण्यासाठी वापरण्यात येणारा त्या व्यक्तीचा एक जुना मोबाइल (सॅमसंग एम 31), एक मोबाइल (रेडमी 8ए), एसीअर कंपनीचा एक मॉनिटर, एक झेब्रोनिक कंपनीचा सीपीयू, की बोर्ड, माऊस व कॅनॉन कंपनीचा प्रिंटर जप्त करण्यात आला.
रेल्वे सुरक्षा बल पनवेल येथे गुन्हा रजि. क्र.79/2021 यु/एस-143 रेल्वे अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून मनोहर मेश्राम याला अटक करण्यात आले आहे. वरिष्ठ निरीक्षक जसबीर राणा यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रेनू पटेल अधिक तपास करीत आहेत.