माणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील प्रतिष्ठेची पन्हळघर बुद्रुक ग्रामपंचायत बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट)ने जिंकली असून या ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला.तालुक्यातील देगाव ग्रामपंचायत शेकापने तर पन्हळघर खुर्द ग्रामपंचायत ठाकरे गटाच्या शिवसेनेने जिंकली आहे. माणगाव तालुक्यातील पन्हळघर बुद्रुक, पन्हळघर खुर्द आणि देगाव या तीन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान होऊन मतमोजणी सोमवारी (दि. 17) सकाळी माणगाव प्रशासकीय भवन येथील सभागृहात झाली. नायब तहसीलदार बी. वाय. भाबड यांच्या मार्गदर्शनाखाली देगाव ग्रामपंचायतीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून किरण पडवलकर, पन्हळघर बुद्रुक ग्रामपंचायतीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रणजित लवटे तर पन्हळघर खुर्द ग्रामपंचायतीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विनोद मिंढे यांनी काम पहिले. पन्हळघर बुद्रुक ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) चे संतोष सीताराम वातेरे (242) विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादीचे रमेश तुकाराम भोनकर (153) यांचा पराभव केला. करुणा नितेश जाधव, सुजन सुभाष शिगवण, विजया रवी वातेरे, प्रमोद सीताराम नवाले, गेनी गंपू हिलम हे (शिंदे गट) पाच उमेदवार सदस्यपदी बिनविरोध निवडून आले होते. तर सोमवारी झालेल्या मतमोजणीत भारती सुरेश मळेकर, महेश टिकम धाडवे (शिंदे गट) हे ग्रामपंचायत सदस्यपदी विजयी झाले. आमदार भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या विकासकामांच्या बळावर पन्हळघर बुद्रुक ग्रामपंचायत जिंकल्याचा आपल्याला आनंद होत असल्याचे सांगून जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी सर्व मतदार व कार्यकर्त्यांचे आभार मानले.