Breaking News

पद्मदुर्ग किल्ल्याकडे पुरातत्त्व खात्याचे दुर्लक्ष

महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे आकर्षण इतिहासप्रेमींइतकेच सर्वसामान्यांनाही आहे. गड-किल्ल्यांचा रोमांचकारी इतिहास, कथा- कादंबर्‍यांपेक्षा प्रत्यक्ष स्थळ दर्शनाने इत्थंभूत उभा राहतो. ज्याची आरमारावर सत्ता त्याची जगावर सत्ता ही धारणा दस्तुरखुद्द छत्रपती शिवरायांची होती. या द्रष्टेपणातूनच महाराजांनी महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पाच प्रमुख जलदुर्ग उभे केले. त्यामध्ये मुरूडच्या पद्मदुर्गचा समावेश आहे.

ऐतिहासिक दस्तऐवजानुसार इस 1678च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांनी पद्मदुर्गाच्या बांधकामास सुरुवात केली, तर बांधकामाची समाप्ती राजे संभाजींनी केली असा उल्लेख आढळतो. सिद्दीच्या ताब्यात असलेला जंजिरा महाराजांनी 14-15 वर्षे जंग जंग पछाडून देखील सर करता आला नाही. म्हणूनच अभेद्य आणि बेलाग अजिंक्य जंजिर्‍यावर करडी नजर ठेवण्यासाठी पद्मदुर्गची निर्मिती अर्थात दंडा राजपुरीच्या उरावर टेहळणी होती. दर्यासारंग दौलतखान या पहाडी छातीच्या आरमार प्रमुखांवर भिस्त होती. असा ऐतिहासिक दृष्या रंजक इतिहास असलेला किल्ला आज अत्यंत हीन दीन रुपात कसाबसा तग धरून आहे. 

सुप्रसिद्ध ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर विजय मिळवता यावा यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिरा किल्ल्याच्या अगदी समोर कासा (पद्मदुर्ग) किल्ल्याची उभारणी केली.चहूबाजूला समुद्र व समुद्राच्या अगदी मध्यभागी हा किल्ला असल्याने असंख्य पर्यटकांना याचे विशेष आकर्षण आहे. परंतु या किल्ल्याकडे सातत्यपूर्ण वाहतूक सुरु करण्यात आलेली नाही. जंजिरा किल्ला हा अगदी जवळ आहे, तर पद्मदुर्ग किल्ला याचे किल्ला व जमिनीतील अंतर चार किलोमीटरचे असल्याने या किल्ल्यावर पोहचताच आपण चहुबाजूनी वेधले गेल्याचा भास निर्माण होतो. सदरील किल्ल्यावर जाण्यासाठी मशीन बोट असल्याशिवाय पर्याय नाही. किमान 40 मिनिटांच्या प्रवासानंतर या किल्ल्यावर पोहचता येते.

किल्ल्यावर पोहचल्यावर आपणास किल्ल्याची खरी परिस्थिती समोर येते. या किल्ल्याच्या भिंती पडल्या आहेत. किल्ल्यावर गवत व झाडी झुडपे बेसुमार वाढल्या असून त्या काढण्याकडे पुरातत्व खाते लक्षच देत नाही. या किल्ल्यात गोड्या पाण्याचे एक तलाव आहे, परंतु ते सुखलेले आढळून येते. या तलावाच्या स्वच्छतेकडे कोणीही ढुकुन पाहत नाही. समुद्राच्या जवळ असणार्‍या किल्ल्याच्या भिंती तुटून पडल्या आहेत, परंतु दुरुस्तीकडे लक्ष दिले जात नाही. बहुतवंशी भिंतींना चिरा व भेगा पडल्या असून याची वेळेत दुरुस्ती झाली तर या किल्ल्याचे अस्तित्व चिरकालाचे राहणार आहे. परंतु पुरातत्व खात्याकडून गेल्या अनेक वर्षात कोणताही पैसा खर्च न करण्यात आल्याने किल्ल्याची अवस्था चिंताजनक झाली आहे. या किल्ल्यात जाण्यासाठी सर्वात महत्वाची म्हणजे येथे तरंगती जेट्टी खूप आवश्यक आहे.कारण मशीनच्या बोटीने पोहचल्यावर साध्या बोटींमधून या किल्ल्याच्या किनार्‍यावर पोहचता येते. जर बोट उपलब्ध न झाल्यास

कंमरेपेक्षावर पाण्यातून किल्ला गाठावा लागतो. यासाठी या किल्ल्यावर तरंगती जेट्टी उपलब्ध झाल्यास किल्यात जाणे-येणे सहज सोपे होऊन पर्यटक व स्थानिक नागरिकांची रेलचेल वाढणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी पुरातत्व खात्याने दुर्लक्षित केली आहे.

या किल्ल्यात जास्त वर्दळ नसल्याने या किल्ल्यात असणार्‍या तोहफा चोरून नेण्याचा प्रताप समोर आला आहे. दीड वर्षांपूर्वी या किल्ल्यात असणारी तोफ चोरून नेण्यात आली होती. याबाबतची रीतसर तक्रार मुरुड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुरातत्व खात्याचा कोणताही व्यक्ती किल्ल्यात हजर नसल्याने व कोणतीही देखरेख नसल्याने या किल्ल्यातील देखभालीकडे पुरातत्व खात्याचे मोठे दुर्लक्ष झाले आहे. जंजिरा किल्ल्यावर पुरातत्व खात्याने एक विशेष व्यक्ती तैनात केली आहे. परंतु पद्मदुर्ग किल्ल्यात कोणीही व्यक्ती हजर नसतो. रायगड किल्ल्यासाठी 20 कोटी रुपये शासनाचा निधी मिळतो, परंतु जलदुर्ग किल्ल्यासाठी कोणताही निधी न मिळाल्यामुळे हे किल्ले विकासापासून दुरावले आहेत. प्राचीन वास्तूंचे महात्म्य टिकवणे हे पुरातत्व खात्याचे काम असताना सुद्धा ऐतिहासिक प्राचीन किल्ल्याच्या देखभालीकडे पुरातत्व खाते दुर्लक्ष करीत असल्याचे या वेळी स्पष्ट होत आहे.

पुरातत्व खाते स्वतःही काही करीत नाही व दुसर्‍याला काही सुधारणा करावयाची असल्यास त्यात आडकाठी व नियमांचे उल्लंघन होऊ नये म्हणूल नोटीस पाठवते. त्यामुळे गड-किल्ले आहेत त्याच स्थितीत राहिले आहेत. जलदुर्ग हे कोकणातील वैभव असताना सुद्धा या किल्ल्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने सर्वसामान्य नागरिक व इतिहास प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. जलदुर्ग हे पाण्यात असल्याने यांच्या दुरुस्तीसाठी मोठा खर्च अपेक्षित आहे. परंतु आजतागात जलदुर्गाच्या देखभालीसाठी निधी मिळत नसल्याने जलदुर्गाचे संवर्धन व दुरुस्ती पाहिजे त्या प्रमाणात होत नसल्याचे चित्र या ठिकाणी स्पष्ट दिसत आहे.

कोकणातील बहुतेक जलदुर्गांना 350 वर्षपूर्वींचा इतिहास प्राप्त आहेत. परंतु ढासळणारे भाग त्वरित दुरुस्ती होतांना पहावयास मिळत नाही. ज्वलंत इतिहास हा किल्ल्याच्या रूपाने साक्षीदार असताना किल्ल्याचेच आयुष्य वाढवण्याची शासनदरबारातून मोठे सहकार्य खूप आवश्यक बाब मानली जात आहे. इतिहास ज्वलंत ठेवायचा असेल तर आपले गड-किल्ले शाबूत ठेवणे हि काळाची गरज असून त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

– संजय करडे

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply