शिवसेना-राष्ट्रवादी आमनेसामने
श्रीवर्धन : प्रतिनिधी
राज्यात तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले असले तरी स्थानिक पातळीवर या पक्षांचे आपापल्या सोयीचे राजकारण सुरू असल्याचे दिसून येते. अशाच प्रकारे श्रीवर्धनच्या नगराध्यक्षपद निवडणुकीसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्र्रेस, काँग्रेस, शेकाप आघाडी अशा दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे.
श्रीवर्धन नगर परिषदेचे नगराध्यक्ष नरेंद्र भुसाणे हे दीर्घकालीन रजेवर गेल्याने तांत्रिक अडचणीमुळे त्यांचे पद जिल्हाधिकार्यांनी रद्द केले व नगराध्यक्षपदाची निवडणूक जाहीर केली. नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून नगरसेवक अनंत गुरव, तर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपनगराध्यक्ष तथा प्रभारी नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादीला काँग्रेस व शेकापचा पाठिंबा आहे.
नगराध्यक्षपद निवडणुकीसाठी 25 सप्टेंबर रोजी मतदान होणार असून, नगरसेवकांचे संख्याबळ पाहता सातनाक यांची निवड निश्चित मानली जात आहे, मात्र राज्यात या सर्व पक्षांची महाआघाडी असताना श्रीवर्धनमध्ये मात्र नगराध्यक्षांची सामोपचाराने बिनविरोध निवड होऊ शकली नाही. त्यामुळे वर सत्तेत नेते एकत्र असले तरी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये एकी नसल्याचे चित्र आहे.