Tuesday , February 7 2023

पनवेलमध्ये भाजपचा डबल धमाका

महापौरपदी डॉ. कविता चौतमोल, उपमहापौरपदी जगदिश गायकवाड
पोटनिवडणुकीत रूचिता लोंढे यांची बाजी

पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत डॉ. कविता चौतमोल, उपमहापौरपद निवडणुकीत जगदिश गायकवाड व नगरसेवकपदाच्या पोटनिवडणुकीत रूचिता लोंढे या भाजप, आरपीआय मित्रपक्षाच्या उमेदवारांनी भरघोस मताधिक्य मिळवून दणदणीत व अपेक्षित विजय मिळवत पनवेलमध्ये महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला.
पनवेल महापालिकेची स्थापना 1 ऑक्टोबर 2016 रोजी झाली. पनवेलच्या पहिल्याच निवडणुकीत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली 78 नगरसेवकांपैकी 51 नगरसेवक जिंकून पनवेल महापालिकेवर विजयाचा झेंडा रोवला. अडीच वर्षांनंतर पुन्हा महापौरपदासाठी निवडणूक जाहीर झाली. या निवडणुकीत भाजप मित्रपक्षांच्या उमेदवार डॉ. कविता चौतमोल, तर
उपमहापौरपदासाठी जगदिश गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, तसेच शेकापनेही या पदांसाठी आपला उमेदवार दिला. पक्षीय बलाबल पाहता भाजप उमेदवारांचे पारडे अधिक जड होते. त्यामुळे फक्त निकालाची औपचारिकताच शिल्लक होती. ती शुक्रवारी 49 विरुद्ध 27 असा निकाल जाहीर होऊन पूर्ण झाली. त्यानुसार पुन्हा एकदा महापौरपदी डॉ. कविता चौतमोल, तर उपमहापौर म्हणून जगदिश गायकवाड दणदणीत मतांनी विजयी झाले आहेत.
नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागी प्रभाग 19 ‘ब’च्या पोटनिवडणुकीत मुग्धाताईंच्या कन्या रूचिता यांना संधी देण्यात आली. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रूचिता लोंढे यांचा घरोघरी जाऊन जोरदार प्रचार केला. विरोधकांनी प्रचाराच्या अनेक क्लुप्त्या केल्या, मात्र आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर त्या फोल ठरल्या. या निवडणुकीत रूचिता गुरुनाथ लोंढे यांना 6231, तर महाविकास आघाडीच्या उमेदवार स्वप्नल लक्ष्मण कुरघोडे यांना अवघी 2387 मते पडली. रूचिता यांनी तब्बल 3844 मतांची आघाडी घेऊन शिवसेनेच्या स्वप्नल कुरघोडे यांचा दणदणीत पराभव केला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नथीतून वार करण्याचा प्रयत्न करणारी शिवसेना पनवेल महानगरपालिकेत शून्यावरच राहिली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या हाती भोपळाच राहिला, अशी चर्चा पनवेलमध्ये रंगली होती.
सर्व विजयी लोकप्रतिनिधींचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष जयंत पगडे, सभागृह नेते परेश ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. या वेळी घोषणा, ढोलताशा व फटाक्यांच्या गजरात जल्लोष करण्यात आला. त्यामुळे पनवेलमध्ये सर्वत्र जल्लोषमय वातावरण पाहायला मिळाले.

Check Also

फॉर्म हरवलेला पक्ष

नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार निवडण्यापासूनच वादाला तोंड फुटले होते. आता निकाल लागून पाच दिवस …

Leave a Reply