Breaking News

नवसाला पावणारा म्हसळ्याचा माघी गणेश

म्हसळा : प्रतिनिधी

म्हसळा शहरात देवज्ञ समाजाच्या गणेश मंदिराची फार मोठी आख्यायिका आहे. माघ महिन्यातील विनायक चतुर्थीला म्हणजे मंगळवारी (दि.28) या मंदिरात माघी गणेश जयंतीचा उत्सव होणार आहे. देवज्ञ समाजाच्या या मंदिरातील गणेश नवसाला पावणारा, भक्तांच्या संकटकाळी धावणारा व तारणकर्ता असल्याचे अनेक भक्त सांगतात.

म्हसळा शहरांतील ग्रामदेवता असणार्‍या श्री धावीर मंदिराच्या चबुतर्‍यावर पिंपळाच्या झाडाच्या पारंब्या गुहेच्या आकाराप्रमाणे होत्या व त्यात सुमारे 127 वर्षापुर्वी शेंदूर लेपन केलेल्या गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. महाराष्ट्रात लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचा पायंडा पाडला, त्या काळात देशातील ब्रिटीशांची व जंजीरा संस्थानावरील सिद्दीची राजवट संपुष्टात यावी म्हणून स्थानिक मंडळी प्रार्थना करीत असत. तब्बल 40- 42 वर्षानी देवज्ञ समाजाच्या मंडळीनी पारंब्यातील गणेश मूर्तीची पुनर्स्थापना करण्याच्या उद्देशाने ग्रामदेवतेचा कौल घेतला असता, याच परिसरांत मंदिर बांधून पुनर्स्थापना करण्याचा भक्तांना कौल मिळाला. त्यानुसार नजिकच असलेल्या हिंदू वस्तीतील जगन्नाथ नाना शंकर शेट चौकात सुंदर असे मंदिर बांधून तेथे सन 1938 मधील माघ शु. चतुर्थीला सुरेख, देखण्या व कोरीव संगमरवरी गणेश मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली.त्या दिवसापासून या मंदिरात माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. 1935 -38 या कालावधीत देवज्ञ समाजाचे मुंबई व स्थानिक मंडळातील दानशूर मंडळीच्या सहकार्याने मंदिर उभे करण्यात आले. मंदिरातील श्री गणेशाची मूर्ती तिबेटीयन संगमरवरी दगडापासून बनविलेली आहे. म्हसळयातील ग्रामदेवता, श्री गणेश, श्री राम, श्री राधाकृष्ण, श्री मारूती अशी सर्व मंदिरे जगन्नाथ नाना शंकर शेट या चौक परिसरांत आहेत. पुर्वी प्रत्येक समाजाकडे एक एक मंदिराची देखभाल असे त्याच पध्दतीने श्री गणेश मंदिराची जबाबदारी देवज्ञ समाजाकडे आली असावी, असे समाजाचे  अध्यक्ष प्रभाकर पोतदार सांगत असत. या गणेशोत्सवानिमित्त मंगळवारी पूजा, अभिषेक, किर्तन, भजन, हळदी कूंकू, बुधवार (दि. 29) श्री पूजन, सत्यनारायणाची महापूजा व आर्केस्टा अशा कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply