Breaking News

चौलचे शितळामातेचे जागृत देवस्थान

रेवदंडा ः प्रतिनिधी

चौल म्हणजे प्राचीन चंपावतीनगरी,  प्राचीनकाळी चौलमध्ये 360 मंदिरे असल्याचा उल्लेख सापडतो. संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिद्धीस असलेले चौलचे शितळामाता मंदिर त्यापैकीच एक आहे. चौलच्या आंबेपुरी पाखडीत हिरव्या गर्द नारळ पोफळीच्या छायेत शितळादेवीचे भव्य मंदिर आहे. या देवतेवर आंग्रे घराण्याची दृढ श्रद्धा होती. आंग्रे काळातच 1759मध्ये या मंदिराचा जिर्णोद्धार झाल्याचे लिखीत मिळते. या मंदिराचा प्रथम जिर्णोध्दार इ. स. 158मध्ये बाबूभट उपाध्ये यांनी द्रव्य मिळवून केल्याची नोंद आहे. इ. स.1767मध्ये विसावी सरसुभेदार यांनी ब्राम्हण भोजन घातले. 1785 मध्ये एप्रिलच्या सुमारास राघोजी आंग्रे कुटूंबासह देवीच्या दर्शनाला आले होते, तर 1792च्या ऑक्टोबर महिन्यात मुलाबद्दलचा नवस फेडण्यासाठी आले होते. 1805मध्ये बाबूराव आंग्रे दर्शनाला आल्याचा उल्लेख असून दरवर्षी दसर्‍यांच्या दिवशी आंग्रे कुटूंब दर्शनाला न चुकता येई व देवीच्या रक्षकाचा मान देत असत. आंग्रेकालीन लाकडी व कौलारू मंदिर आता पाडून ग्रामस्थांनी 27 मार्च 1990 रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन मंदिर बांधले. मार्च 1997मध्ये रायगडचे तत्कालीन जिल्हाधिकारी रघुनाथ राठोड यांचे हस्ते उद्घाटन झाले. या मंदिराच्या बाहेर उजव्या बाजूला गुलमादेवी, खोकलादेवी, व खरूजादेवीच्या मूर्ती आहेत. जर कोणाला गुलमा झाल्या असेल तर तो जाण्यासाठी गुलमादेवीला ओटी भरणे, कोणाला खोकला झाला असेल तो जाण्यासाठी तर खोकलादेवीची ओटी भरणे, तर कोणाला खरूज झाली असेल तर ती जाण्यासाठी खरूज देवीची ओटी भरून शितळामातेचा आशीर्वाद घेतात, अशी भाविकांची धारण आहे. शितळामातेच्या मंदिराच्या समोरील पुष्करणीतील पाण्याने पाय धुवूनच मंदिरात प्रवेश घेण्याची प्रथा आहे. मंदिर परिसरात असलेल्या गोळबादेवी व भरडादेवी या शितळामातेच्या उपदेवता असल्याचे सांगितले जाते. चंपावती नगराला समुद्राचा वेढा होता. समुद्राच्या लाटाने चंपावती नगरीची तटबंदीसारखी तुटून नुकसान होत असे. त्यामुळे राणी हतबल होऊन दुखी होई. बरेच दिवस लोटल्यावर राणीने एकांतात अनुष्ठानास आरंभ केला. मौनव्रत पाळून देवीच्या उपासनेला सुरुवात केली असे नवरात्रीचे आठ दिवस गेले. राणीच्या उपासनेला यश आले. राणीने सागरापासून होणार्‍या त्रासाबद्दलची कहाणी देवीला कथन केली. या सागराच्या संकटापासून नगरीचे रक्षण कर असे सांगताच देवीने क्षण ही न घालवता माझे शक्तीने सागराला शांत करेन असे म्हणत हातातील तुंंबर सागरावर फेकला व सागर अडविला. सागर भयभीत होऊन शितळामातेस शरण आला व यापुढे या नगरीला कोणत्याही प्रकाराचा त्रास होणार नाही असे वचन सागराने देवीला दिले व शितळामातेस राज्य करण्यासाठी सिंहासनी बसवले. पुजापात्र घेऊन मातेची पुजा करून निर्मळ गंगाजळ, हळद कुंकू, आभुषणे, कनक, वस्त्र, श्रीफळ अर्पण केले. त्यापासून देवीचे स्थान या चंपावतीनगरीत निर्माण झाले. शितळादेवीचा दरबार देवदेवतेचे माहेरघर आहे. देवदेवता दर्शनासाठी येऊ लागल्या, अशी पौराणिक आख्यायिका सांगितली जाते. या मंदिर परिसरात देवीची ओटी भरण्यासाठी साहित्य विक्री करण्यासाठी विक्रेते आहेत. तेथे नारळीपाक,चिक्की, तसेच बकुळीचे गजरे विक्रीस ठेवले जाते, याची खरेदी करण्याची महिलांची गर्दी असते. चौलनाका ते शितळादेवी मंदिरापर्यंत अनेक घरगुती कॉटेज असून तेथे राहण्याची व जेवण्याची सोय असते. भक्तांना कौल देणारे चौलचे शितळामातेचे जागृत देवस्थानास असंख्य भाविक नित्याने भेट देत असतात.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply