सुटी असूनही पर्यटकांची पाठ
मुरूड : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याठी सोमवारी शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच बँका आणि खासगी आस्थपनांना सुटी देण्यात आली होती. मतदानाला महत्त्व देत मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, सुटी असूनही मुरूड बाजारपेठेत शुकशुकाट होता. एरव्ही सुटीच्या दिवशी मोठ्या संख्येने येणार्या पर्यटकांनीही सोमवारी मुरूडकडे पाठ फिरवली होती. सोमवारी मतदानासाठी उत्साह दिसून आला व ग्रामीण भागातील मतदारही मतदानासाठी आपापल्या गावातच थांबून राहिले. या मतदारांतही मतदानाचा उत्साह दिसून येत होता. मुरूड शहरातही सकाळी खूप मंद गतीने मतदान होत होते, मात्र दुपारी 12 वाजेनंतर मतदान केंद्रातील प्रत्येक बूथवर गर्दी पाहावयास मिळाली. शनिवार, रविवार व सोमवार अशी सलग तीन दिवस सुटी असूनसुद्धा मुरूडकडे पर्यटक फिरकलेच नाहीत. त्यामुळे समुद्रकिनार्यांवर गर्दी पाहावयास मिळाली नाही. सुटीचे दिवस असतानाही ग्राहक नसल्याने हॉटेल, लॉजिंग व दुकानदारांनी टीव्हीवरील बातम्या पाहणे पसंत केले होते.