Breaking News

महाविकास आघाडीत धुसफूस

काँग्रेस नेते मिलिंद देवरांचे सोनिया गांधींना पत्र

मुंबई ः प्रतिनिधी
राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीतील नाराजी चव्हाट्यावर आली असतानाच आता काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी पक्षाच्या हायकमांड सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान काँग्रेसकडून देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता महाविकास आघाडी सरकारने करावी, अशी मागणी करणारे पत्र काँग्रेसचे माजी खासदार असलेल्या देवरा यांनी लिहिले आहे. त्यांच्या या पत्रामुळे महाविकास आघाडीत धुसफूस सुरू असल्याचे बोलले जात आहे.
महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष निवडणुकांच्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनपूर्तीच्या दिशेने प्रयत्न करीत आहेत. काँग्रेसनेही वचननाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण करण्यास सुरुवात करावी, असे मिलिंद देवरा यांनी सोनियांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. या पत्रामुळे महाआघाडीत काँग्रेसला डावलले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
मिलिंद देवरा यांनी पत्रात लिहिले आहे की, गेल्या 50 दिवसांत शिवसेना आणि राष्ट्रवादी निवडणुकीदरम्यान दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात व्यस्त आहे. मार्च 2019मध्ये राहुल गांधी यांनी मुंबईमधील रॅलीत भाषण करताना मी दिलेल्या सल्ल्यानंतर गरिबांना 500 स्क्वेअर फूट घर देण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर हा मुद्दा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आला होता. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदी असताना मुंबईकरांना हे आश्वासन दिले होते. अद्यापही त्याची अंमलबजावणी करण्यासाठी काहीच सुरुवात न झाल्याने मला चिंता वाटत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेला आपण अनेक आश्वासने दिली आहेत. त्यामुळे या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्रात प्रभावी यंत्रणा उभारण्याची गरज आहे, असेही देवरा यांनी नमूद केले आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी मिलिंद देवरा यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती, मात्र मुंबईतील लोकसभा पराभवाची जबाबदारी स्वीकारत देवरांनी जुलै महिन्यात राजीनामा दिला होता. त्यांच्या आधी संजय निरूपम यांच्याकडे मुंबई काँग्रेसची जबाबदारी होती. देवरा हे राहुल गांधी आणि गांधी कुटुंबीयांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे त्यांच्या मागणीवर प्रभारी अध्यक्ष सोनिया गांधी काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
राजकारण असो की चित्रपट, नाट्यक्षेत्र असो हे तीनही सारखेच आहेत. आमचे तीन पक्ष एकत्र येतील असे वाटले नव्हते, पण आम्ही एकत्र आलो. तीन विचारांच्या पक्षांचे सरकार चालणार कसे, या प्रश्नावर आम्ही म्हणतो, संविधानाच्या चौकटीत राहून हे सरकार चालले पाहिजे. जर तसे झाले नाही, तर सरकारमधून बाहेर पडण्याच्या कडक सूचना सोनिया गांधी यांनी दिल्या आहेत. याची संपूर्ण माहिती आम्ही उद्धव ठाकरे यांना दिली आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले होते. त्यानंतर आता देवरांनी थेट हायकमांडला पत्र लिहिल्याने महाआघाडीत सारे काही आलबेल नसल्याचेच मानले जात आहे.
मलिक म्हणतात, चव्हाण चुकले!
राज्यातील सत्तेत काँग्रेस सहभागी असून, या पक्षाचे नेते बेधडकपणे विधान करीत आहेत. प्रजासत्ताक दिनी काँग्रेस नेते व राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी सत्तेसाठी शिवसेनेकडून लिहून घेतले आहे, असे वक्तव्य केले. या विधानावर राष्ट्रवादीने आक्षेप घेत चव्हाण यांचे हे विधान चुकीचे आहे. सत्तेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी किमान समान कार्यक्रमावर सह्या केल्या आहेत. त्यामुळे अशोक चव्हाण यांची बोलण्याची पद्धत चुकली, असे राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply