ठिकठिकाणची मंदिरे भाविकांनी फुलली; सार्वजनिक, घरगुती स्वरूपातही पूजन
अलिबाग : प्रतिनिधी
गणेश जयंती अर्थात माघी गणेशोत्सव रायगड जिल्ह्यात मंगळवारी (दि. 28) उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील प्रमुख गणपती मंदिरे यानिमित्ताने भाविकांनी फुलून गेली होती. त्याचप्रमाणे सार्वजनिक, तसेच घरगुती स्वरूपातही हा उत्सव साजरा झाला.
माघ महिन्यात येणारी गणेश जयंती म्हणजे 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती गणपती बाप्पाचा जन्मदिवस. हा उत्सव गणेशभक्त अत्यंत श्रद्धेने व मोठ्या भक्तिभावाने साजरा करतात. अष्टविनायकांपैकी तीर्थक्षेत्र असलेले महड आणि पाली, तसेच कडाव (कर्जत), दिवेआगर (श्रीवर्धन), नांदगाव (मुरूड), मुगवली (माणगाव), चिरनेर (उरण), कुलाबा किल्ला (अलिबाग) या व इतर गणेश मंदिरांत भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती.
जिल्ह्यात ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले गेले होते. महाप्रसादही देण्यात आला.