कर्जत : बातमीदार
तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायत हद्दीतील ताडवाडी आणि मोरेवाडीमध्ये पावसाळ्यापूर्वी नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित करावी, असे आदेश रायगड जिल्हाधिकारी यांनी ऑक्टोबर 2017 मध्ये दिले होते. डिसेंबर 2017 मध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाने या योजनेची घोषणा केली होती. गतवर्षी जिल्हा परिषदेने या योजनेला मंजुरी दिली आहे. मात्र आजमितीला सदर नळपाणी पुरवठा योजना कागदावरच आहे. दरम्यान या दोन्ही गावांतील आदिवासी महिलांना पाण्यासाठी डोक्यावर हांडे घेऊन जावे लागत आहे.
सात पाड्यांची बनलेली ताडवाडी ही कर्जत तालुक्यातील मोठी आदिवासीवाडी समजली जाते. तर शेजारी असलेली मोरेवाडी ही ताडवाडीच्या विहिरीवर अवलंबून असलेली आदिवासीवाडी आहे. त्या दोन्ही आदिवासी वाड्यामधील महिलांना पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी जानेवारी महिन्यापासून रात्र विहिरीवर काढावी लागते.
गतवर्षी त्याबाबत माध्यमांनी दखल घेतल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांनी जिल्हा परिषदेला सूचित केल्यानंतर जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाने 27 लाख रुपयांची तरतूद विहीर दुरुस्तीसाठी केली होती. मात्र स्थानिक आदिवासींनी आम्हाला दुरुस्ती नको तर नवीन पाणी योजना पाहिजे आणि त्या योजनेचा उदभव हा बांगरवाडी मातीच्या बंधार्याचा असावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर जि. प. च्या लघु पाटबंधारे विभागाने त्या ठिकाणी नळपाणी योजनेसाठी मंजूर करण्यात आलेला 27 लाखाचा निधी थांबवून ठेवला. जानेवारी 2018मध्ये अंदाजपत्रक तयार करताना नवीन नळपाणी योजना ही बांगरवाडी येथे असलेल्या मातीच्या बंधार्यातील उद्भव निश्चीत करण्यात आला. त्यासाठी नव्याने तयार करण्यात आलेले अंदाजपत्रक एप्रिल 2018 मंजूर झाले नाही. त्यानंतर आमसभेत डोंगरपाडा येथील पाझर तलावाच्या पाण्यावर मोरेवाडी तसेच ताडवाडीसाठी नळपाणी योजना राबविण्याची सूचना करण्यात आली. त्यासाठी 93 लाख रुपयांचे नवीन अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. दरम्यान, ताडवाडी आणि मोरेवाडी येथील लोकांसाठी असलेल्या दोन्ही विहिरी सध्या कोरड्या पाडण्याच्या मार्गावर आहेत. त्यावेळी मोरेवाडी येथील महिलांची शेजारी असलेल्या बांगरवाडी मातीच्या धरणावर पाण्यासाठी भटकंती सुरु झाली आहे.
ताडवाडी आणि मोरेवाडीसाठी डोंगरपाडा पाझर तलावाच्या पाण्यावर नळपाणी योजना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभा निवडणूक आल्याने योजनेला अंतिम मंजुरी मिळाली नव्हती, आता या योजनेतील कामांना गती मिळाली असून, सदर योजना महिनाभरात सुरू होईल.
-रेखा दिसले, सदस्य, रायगड जिल्हा परिषद
ताडवाडी आणि मोरेवाडी येथील नळपाणी योजनेची दुरुस्ती करण्यासाठी निधी मंजूर आहे, मात्र स्थानिक लोकांनी उद्भव बदलण्याची सूचना केल्याने सर्व अंदाजपत्रक नव्याने तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे अद्याप कामाला सुरुवात झाली नाही.
-डी. आर. कांबळे, उपअभियंता, लघुपाटबंधारे विभाग