Breaking News

क्षुल्लकीकरणाचे वारे

गेल्या काही वर्षांत राजकारणाची पातळी घसरत चालली आहे. परंतु या घसरलेल्या पातळीचा संबंध भारतीय जनता पक्षाशी लावण्याचा ‘उद्योग’ काही लोक करू लागले आहेत. वास्तविक राजकारणाचे क्षुल्लकीकरण प्रामुख्याने कुणी केले असेल तर ते सत्ता गमावून बसलेल्या काँग्रेसनेच. पंतप्रधान मोदी यांच्या उदयाने अस्वस्थ झालेल्या काँग्रेसच्या पुढार्‍यांनी गेली काही वर्षे इतक्या खालच्या पातळीवरील टीकाटिपण्णी केली आहे की विचारता सोय नाही.

आजकालच्या राजकारणाचा स्तर पाहून जुन्या व जाणत्या मतदारांना अचंबित व्हावे लागत असेल यात शंका नाही. काही राजकीय पुढार्‍यांच्या वक्तव्यांना इतकी अमाप प्रसिद्धी मिळते की अशी वक्तव्ये म्हणजेच राजकारण असा काहिसा ग्रह समाजामध्ये पसरू लागलेला आहे. अद्वातद्वा बोलून झटपट प्रसिद्धी मिळवण्याचे आगळेच तंत्र काही नेतेमंडळी आत्मसात करू लागली आहेत. ज्येष्ठ नेते बव्हंशी या प्रकारची वक्तव्ये करीत नाहीत. हा प्रकार दुसर्‍या किंवा तिसर्‍या फळीतील पुढार्‍यांमध्ये दिसून येतो. बेलगाम वक्तव्ये करून आपण आपल्याच पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांची कुचंबणा करीत असतो याचे भान या नेतेमंडळींना राहात नाही. दिल्लीत भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी सोमवारी केलेल्या टीकावजा वक्तव्यांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जण तुटून पडले आहेत असे दिसले. त्यातच मुंबईमध्ये सुधारित नागरिकत्व कायद्यासंदर्भात बोलताना भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर प्रखर टीका केल्याने गदारोळ माजला. या कथित वक्तव्याबद्दल शेलार यांनी माफी देखील मागितली. परंतु काही टीव्ही वाहिन्यांनी हा विषय चालूच ठेवून वादाची आग आणखी भडकेल याची व्यवस्था केली. शेलार हे अत्यंत जबाबदार नेते आहेत. त्यांच्या टीकेच्या सूर काहिसा प्रखर लागला तरी त्याला वैयक्तिक टीका मानण्याचे काही कारण नव्हते. राजधानी दिल्लीमध्ये भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी केजरीवाल यांच्यावर केलेल्या टीकेबाबतही असेच म्हणता येईल. परंतु वादग्रस्त विधाने हे माध्यमांसाठी विशेष खाद्य असते. आगीत तेल ओतण्याची ही सुसंधी सोशल मीडियावरील नेहमीच्या महाभागांनी पुरेपूर घेतली. हा सारा प्रकार राजकारणाच्या क्षुल्लकीकरणाचे उदाहरण म्हणून सांगता येईल. दिग्विजय सिंह, मणिशंकर अय्यर यांच्यासारख्या काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांची जात काढण्याची उठाठेव देखील केली. त्या पक्षाचे माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना अनेकदा जाहीररित्या ‘चोर’असे संबोधले व त्यासाठी न्यायालयात माफी देखील मागितली. हा सारा इतिहास जुना नव्हे. राजकारणात थोडीफार शाब्दिक धक्काबुक्की ही व्हायचीच. परंतु विरोधासाठी मुद्दे उरले नसले की शिवराळ भाषा ओठांवर येते. दुर्दैवाने टीव्ही वाहिन्यांसारखी माध्यमे त्याला खतपाणी घालतात. सोशल मीडियावर तर कुठलेच निर्बंध नसल्याने त्याचा उपयोग वैयक्तिक निंदानालस्ती आणि शिवीगाळ यासाठीच होतो. समाजाची ही नकोशी बाजू आपोआप राजकारणात देखील झिरपली आहे. आणि याच विषयीच्या बातम्यांना हल्ली अधिक मोठे स्थान मिळते. राजकारण हे समाजाच्या विकासासाठी आणि प्रबोधनासाठी करावयाचे असते. परंतु आपण समाजासाठी राबणारे सेवक असल्याची भावना राजकारणातून लोप पावते आहे की काय असे भय वाटू लागले आहे. या फुटकळ राजकारणाला फारशी किंमत दिली नाही तर आपोआप हे क्षुल्लकीकरण संपुष्टात येईल.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply