मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादीचे साकडे
मुंबई : प्रतिनिधी
तिथीचा हट्ट सोडून 19 फेब्रुवारी शिवजयंतीची तारीख जाहीर केली जावी, असे आवाहन राज्यातील सत्तेत भागीदार असणार्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी याबाबत ट्विट केले आहे. यामुळे महाविकास आघाडीत पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
शिवसेना दरवर्षी तिथीनुसारच शिवजयंती साजरी करते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या वेळी इंग्रज भारतात नव्हते. त्यामुळे इंग्रजी पद्धतीने कालगणनाही केली जात नव्हती. तेव्हा शिवरायांची जयंती ही मराठी तिथीप्रमाणेच साजरी व्हायला हवी ही शिवसेनेची भूमिका आहे. शिवसेनेने वारंवार आपली भूमिका बोलूनही दाखवली आहे, मात्र सध्या राजकीय परिस्थिती वेगळी आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्रितपणे सत्तेत आहे. तीन पक्षांनी मिळून सरकार स्थापन केले असल्याने एकमेकांच्या मागण्या, तसेच भावनांचा आदर राखण्यावर एकमत होणे आवश्यक आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या या आवाहनाला शिवसेना कसा प्रतिसाद देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.