नवी मुंबई : प्रतिनिधी : नेरूळ व सानपाडा स्थानकाला जाहिरातींनी ग्रासले आहे. नेरूळ स्थानकाचे मुख्य प्रवेशद्वार, तसेच संपूर्ण स्थानकातील बाह्य बाजू जाहिरातींनी वेढल्यामुळे ही स्थानके जाहिरातींत हरवल्याचे दिसत आहे. त्यामुळे या स्थानकांना गलिच्छ रूप प्राप्त झाले असून आधुनिक स्थानकांचा टेंभा मिरवणार्या सिडकोला मात्र जाहिरातदारांचे अतिक्रमण दिसत नसल्याची खंत नागरिक व्यक्त करू लागले आहेत.
नवी मुंबई शहर वासवण्यास सुरुवात झाल्यावर प्रथमतः रेल्वे स्थानके तयार करण्यात आली. ही आकर्षक स्थानके म्हणजे पूर्वी नवी मुंबईची पर्यटनस्थळे बनली होती. या स्थानकांमध्ये हिंदी चित्रपटांची शूटिंग झालेली आहेत, मात्र जसजशी नवी लोकसंख्या वाढली व व्यवसाय वाढले तशी नवी मुंबईतही स्थानकांच्या इमारतींमध्ये असणारे व्यवसाय वाढले. नवी मुंबईच्या काही स्थानकांत वाणिज्य व्यवसाय करण्यासाठी लहान लहान व्यवसायिकांना सिडकोने जागा दिलेली आहे, मात्र त्याचा फटका या आधुनिक स्थानकाला बसू लागला आहे. या दोन मजली स्थानकांच्या बाह्य भागाला सर्वत्र जाहिरातींनी वेढले आहे. त्यामुळे स्थानकांच्या दोन्ही बाजूने बाह्य भागांना गलिच्छ रूप आलेले आहे. स्थानकाच्या भिंती जाहिरातींनी भरल्या आहेत. सिडकोचा अतिक्रमण विभाग नेहमी स्थानकांतील मार्जिनल स्पेस वापरणार्या दुकानांवर कारवाई करत असतो, मात्र या विभागातील अधिकार्यांना जाहिरातींनी स्थानकाच्या बाह्य रूपाला आलेले ओंगळवाणे रूप दिसत नाही का, असा प्रश्न पडतो.
मुंबईतील पूर्वीच्या लोकल ट्रेनमधील भाग जाहिरातींनी भरलेले असतात. मुंबईतील रेल्वे स्थानकांतून प्रवास करत आहोत की काय असा प्रश्न नवी मुंबईतील नेरूळ व सानपाडा ही स्थानके बघितल्यावर पडतो. या स्थानकांतील बाह्य भाग रंगवण्याची गरज नाही इतका ताबा जाहिरातींनी घेतला आहे. इंचा इंचावर जहराती चिकटवल्या गेल्या आहेत. त्यात अनेक जहिराती एकमेकांवर चिकटवल्या गेल्याने स्टिकर्सचे थर बसले आहेत.त्यात स्थानकांत असलेल्या दुकानांच्या नावांचे स्टिकर्स लावले असून काही ठिकाणी विविध कोर्स चालवणार्या संस्थांच्या नावांचे स्टिकर्स लावले गेले आहेत. त्यामुळे नवी मुंबईच्या स्थानकांची तुलना मुंबईच्या गलिच्छ स्थाकांमध्ये होऊ लागली आहे.नवी मुंबईतील वाशी, सीवूडस व बेलापूर स्थानके आपली स्वच्छता टिकवून असताना नेरूळ व सानपाडा स्थानकत मात्र स्वच्छतेचा लवलेश दिसत नाही.त्यामुळे स्थानक परिसरात फेरीवाले व दुकानांवर कारवाई करणारे सिडकोचे अधिकारी स्थानकातील व्यवसायिकांच्या जाहिरातींचा मारा वाचवणार का? व्यवसायाचे भाडे देऊन स्थानकांच्या आकर्षक व स्वच्छ भिंतींवर फुकट जाहिराती लावणार्यांकडून सिडको दंड वसूल करणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.