Breaking News

असे होते बाजारातील संधीचे सोने !

कोरोना साथीमुळे घबराट पसरली तेव्हा बाजारात खरेदी करणार्‍यांच्या संधीचे सोने झाले आहे. अशी संधी फार दुर्मिळ असते, ती घेण्यासाठी धाडस मात्र हवे.

When everybody is greedy, be fearful and when everybody is fearful, be greedy.

जेंव्हा बाजारात प्रत्येकजण तेजीबद्दल बोलू लागतो तेंव्हा आपण अशा गोष्टीचा धसका घ्यावयास हवा आणि जेंव्हा शेअरबाजारात गुंतवणूक करण्यासाठी हर-कोणी घाबरलेला असतो तेंव्हा आपण मात्र अधाशीपणानं ताबडतोब गुंतवणूक करावयास हवी, असं शेअरमार्केट मधील जाणकार वॉरेन बफेट म्हणतात. आता याचा नेमका अर्थ काय व ते असं का म्हणतात आणि सध्याच्या परिस्थितीतील त्याचं महत्त्व जाणून घेऊयात.  

मागील लेखात उल्लेख केल्याप्रमाणं शेअरच्या किंमती ह्या कंपन्यांच्या उत्पन्नाच्या आकड्यांच्या आधीन असतात परंतु त्याहीपेक्षा जास्त त्या भावनेच्या आहारी गेलेल्या आढळतात. साधं उदाहरण घेऊ, 24 फेब्रुवारी ते 23 मार्च असा साधारणपणे 1 महिना बाजार पडत होता आणि त्यावेळेस अनेक उत्तम कंपन्यांचे शेअर्स हे अत्यंत कवडीमोल भावात उपलब्ध होते परंतु तेंव्हा प्रत्येकजण धास्तावलेल्या अवस्थेत होता, त्यामुळं बहुतांश लोक शेअरबाजारात गुंतवणूक करण्यास धजावले नाहीत आणि असे कवडीमोल भावातील कंपन्यांच्या शेअर्सचे भाव चांगलेच वधारले. परंतु अशी दुर्मिळ संधी वर्षा-दोन वर्षांमधून एक दोनदाच येते आणि अशा संधीचं सोनं करता येणं म्हणजेच बाजारात यशस्वी होणं.

आता सर्वसामान्य गुंतवणूकदार जर त्या काळात शेअरबाजारापासून दूर राहिला होता तर मग हे भाव कसे काय वाढले? असा प्रश्न सर्वांनाच पडणार. एक साधी सरळ गोष्ट आपण लक्षात घेऊ की, बाजारात प्रत्येक भावात कोणीतरी खरेदीदार असतो व विक्रेता देखील असतो. ज्याला वाटतो की सध्याच्या भावापेक्षा कमी भावात पुन्हा अमूक एक शेअर मिळू शकतो, ती व्यक्ती तो विकण्यास तयार होते व ज्यास वाटतं की, येथून या शेअरचा भाव वाढू शकतो, तो त्या शेअरची खरेदी करण्यास तयार होतो. आता पडेल भावात विकणारे कोण तर इकडच्या तिकडच्या गोष्टी ऐकून बाजार अजून खाली जाईल या भीतीनं नुकसानीमध्ये आपले शेअर्स विकून टाकणारे लहान व किरकोळ गुंतवणूकदार तर, अशा वेळेस मोठे गुंतवणूकदार, मोठ्या गुंतवणूक संस्था, म्युच्यअल फंड, परकीय गुंतवणूक संस्था, अशा प्रकारचे गुंतवणूकदार संधी साधून घेतात व जोरदार खरेदी करतात. अशा मोठ्या गुंतवणूकदारांची गुंतवणूक देखील प्रचंड असते आणि त्यामुळं ज्या शेअर्सची खरेदी असे गुंतवणूकदार करतात, त्यांच्या शेअर्सचे भाव वाढू लागतात. अगदी याच्या विरुद्ध परिस्थिती म्हणजे जेंव्हा बाजारातील प्रत्येकजण गृहीत धरत असतो की, बाजार अजून वर जाईल, शेअरच्या किंमती आणखी वाढतील, तेंव्हा किरकोळ गुंतवणूकदार आपली गुंतवणूक बाहेर काढून न घेता भाव वर जाण्याची वाट पहात बसतात किंवा लोभापोटी चढ्या भावात खरेदी देखील करतात आणि त्याच वेळी चाणाक्ष गुंतवणूकदार विक्री करून आपला नफा पदरात पडून घेत आपली गुंतवणूक बाहेर काढून घेत असतात. आणि दुसरीकडं कोणत्यातरी कारणानं पुन्हा बाजार पडल्यास वरच्या भावात शेअर्स विकून टाकून नफा पदरात पाडून घेण्याची संधी असे किरकोळ गुंतवणूकदार घालवतात व शेअरबाजारास नावं ठेऊ लागतात. सर्वत्र अशा लोकांची संख्या जास्त दिसते कारण ते लोभाची व भावनेची शिकार झालेले असतात. म्हणूनच शेअरबाजारात यशस्वी होण्यासाठी स्वतःच्या अभ्यासाबरोबरच शिस्त ही अत्यंत महत्वाची असते.

सध्या बाजारात काय परिस्थिती आहे हे आपण सर्वच जण जाणून आहोत. मार्केट जेंव्हा पडलं तेंव्हा, म्हणजे मार्च अखेरीस भारतातील कोरोनाच्या असलेल्या परिस्थितीपेक्षा सद्य स्थिती भीतीदायक आहे, तेंव्हाची बाधीत संख्या व आताची बाधीत रुग्ण संख्या यांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. बाधीत रुग्ण संख्या रोज वाढतानाच दिसत आहे, आणि अजून तरी ठोस खात्रीलायक औषध उपलब्ध नाहीय. लॉकडाऊनमुळं अनेक उद्योग ठप्प आहेत, अजून मागणी हवीतशी जोर धरताना दिसत नाहीय, तसंच बेरोजगारीची संभाव्य वाढ आणि त्यामुळं आर्थिक संकटं काठावर आहेत, ज्यामुळं अर्थव्यवस्था नाजूक बनलीय आणि तरीही शेअरबाजार मात्र मार्चमधील पडझडीनंतर सुमारे 44% वरती आलेला आहे. सध्याच्या शेअरबाजारातील वाढ ही मोठ्या अपेक्षांच्या हिंदोळ्यावर आधारीत बाजारात येणार्‍या तरल पैशांच्या ओघामुळं आहे. त्यामुळं क्रेडिट कलेक्शन, संभाव्य एनपीएची हाताळणी व त्यासाठी मिळू शकणारा सरकारचा हात, वाहन उद्योग विक्रीचे सकारात्मक आकडे, विद्युत वापर, ग्राहक उत्पादनांची वाढती विक्री या गोष्टींनी बाजारात नवचैतन्य आणलंय. त्यामुळं,  सध्या बाजारात दोन भिन्न मतप्रवाह आढळून येत आहेत, एक म्हणजे वर्स्ट इज ओव्हर म्हणजे सर्वात वाईट जे घडायचं होतं ते घडून गेलंय व बाजारात आता मोठी पडझड संभवत नाहीय, आणि दुसरं मत म्हणजे वर्स्ट इज नॉट ओव्हर, म्हणजेच कांही जण अनुमान लावत आहेत की बाजार पुन्हा खाली येऊ शकतो.  त्यामुळं या क्षणी बाजारात उडी घ्यायची का नाही हे ज्याचं त्यानं ठरवायचंय, मात्र अत्यंत सावधानता बाळगूनच म्हणजे योग्य वेळी वेळप्रसंगी नफा-नुकसानीचा विचार न करता आपली मुद्दल जपणं हे उद्दिष्ट ठेऊनच !

सुपरशेअर्स – संरक्षण क्षेत्रातील कंपन्या

चीनबरोबर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात संरक्षण मंत्रालयाने 38900 कोटी रुपयांच्या क्षेपणास्त्र, दारूगोळा आणि शस्त्रास्त्रांच्या खरेदीला मान्यता दिली. त्यामुळं सलग दोन सत्रं या क्षेत्रासंबंधीत कंपन्यांचे शेअर्स दहा टक्क्यांपेक्षा जास्त वाढले. गेल्या आठवड्यात संरक्षण अधिग्रहण परिषदेने 12 एसयू -30 एमकेआय, 21 मिग-29 आणि विद्यमान 59 मिग-29 लढाऊ विमानांच्या प्रापणास मान्यता दिली होती. बहुतांश खरेदी ही रशियामार्फत केली जाईल, तर सुखोई -30 एमकेआय लढाऊ विमानं नाशिक येथे हिंदुस्तान एयरोनॉटिक्सच्या सुविधेत बांधले जातील. त्यातच, शुक्रवारी सकाळी पंतप्रधान मोदींनी लडाखला अचानक भेट दिली आणि सीमांतील पायाभूत सुविधांमध्ये तीन पट वाढ जाहीर केल्यानं संरक्षण क्षेत्रासंबंधित समभागांच्या सकारात्मक भावनेलाही चालना मिळाली. हिंदुस्थान एरॉनॉटिक्सचे शेअर्स 775 रुपयांवरून 942 रुपयांवर पोहोचले, तर भारत डायनॅमिक्सचे शेअर्स 311 रुपयांवरून थेट 455 रुपयांपर्यंत उसळले. त्याजबरोबरीनं भारत इलेक्ट्रॉनिक्स या संरक्षण यंत्रणेसाठी विविध उपकरणं बनवणार्‍या कंपनीचे शेअर्स व संरक्षण टेक्नॉलॉजीमध्ये लक्ष घातलेल्या भारत फोर्जचे शेअर्स 15 टक्क्यांपर्यंत वाढले. सध्याच्या काळात राष्ट्रीय सुसज्जतेचं महत्त्व लक्षात घेतल्यास या कंपनीच्या शेअर्सना मागणी ही राहणारच आणि म्हणूनच बाजारातील भाव सुधारणेनंतर आपल्या पोर्टफोलिओमधील एक हिस्सा अशा कंपन्यांसाठी राखून ठेवण्यास हरकत नसावी.   

आता लक्षतिमाही निकालांकडे

गेल्या आठवड्यात देखील बाजारानं आपली उर्ध्व दिशेकडील कूच चालूच ठेवली. राष्ट्रीय बाजाराचा व्यापक आधारभूत निर्देशांक निफ्टी50 हा10850 च्या जवळ पोहोचला तर बाँबे स्टॉक एक्स्चेंजचा निर्देशांक सेन्सेक्स हा 36800 पातळी ओलांडून आला. दोन्ही निर्देशांक एका आठवड्यात अनुक्रमे 160 व 573 अंशांनी वधारले. निफ्टी50 समूहातील बजाज फायनान्सचा शेअर सर्वाधिक म्हणजे 13% वाढला. तर बीएसई200 समूहामधून स्टील ऍथोरिटी ऑफ इंडियाचा (सेल)चा शेअर 20% पर्यंत वधारला. देशाचा जीडीपीचा दर 3 टक्क्यांनी घटेल या अनुमानामुळं बाजाराच्या तेजीला शेवटच्या दिवशी काहीसा लगाम लागला. गेल्या लेखात उल्लेखल्याप्रमाणं निफ्टीनं 10800चा टप्पा गाठला मात्र त्यावर बंद देण्यास बाजार अपयशी ठरला. पुढील आठवड्यात पहिल्या तिमाहीचे निकाल व जागतिक बाजार आपल्या बाजाराची सूत्रं हातात घेतील असं वाटतं. निफ्टीसाठी 10850 ते 11000 हा पट्टा अडथळा म्हणून विचारात घेता येऊ शकतो तर खालील बाजूस 10600 व 10550च्या आसपास निफ्टीस आधार संभवतो.  

प्रसाद ल. भावे. (98220 75888)

sharpadvisersgmail.com

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply