Breaking News

नेरळमध्ये पे अँड पार्कची सुविधा

बाजारपेठेतील वाहतूक कोंडीवर मध्य रेल्वेकडून उपाययोजना

कर्जत : बातमीदार

नेरळमधील बाजारपेठेत शहरासह आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ खरेदीसाठी अनेकदा आपल्या वाहनाने येतात. शहरात वाहने पार्किंगची सोय नसल्याने रस्त्यालगतच वाहने उभी केली जातात. त्यामुळे नेरळमध्ये कायम वाहतूक कोंडी होते. मात्र आता मध्य रेल्वेकडून नेरळमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकासमोर पार्किंगची सोय करण्यात आली असून, त्यामुळे नेरळ बाजारपेठेतील  पार्किंगचा प्रश्न निकाली निघाला आहे.कर्जत तालुक्यातील नेरळ शहराचे नागरिकीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. नेरळ बस स्थानक परिसरातील रस्त्यांवरच दुचाकी, चारचाकी वाहने उभी केली जात असल्याने तेथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. रेल्वे स्टेशन बाहेर तर पूर्ण रस्ताच बंद असल्याचे दिसून येते. नेरळ हे आजूबाजूच्या सुमारे 50 गावांना जोडले गेले आहे. त्या सर्वाना नेरळची बाजारपेठ ही खरेदीसाठी सोयीची पडते. खरेदीसाठी नागरिक आपल्या वाहनाने नेरळमध्ये येतात. मात्र नेरळमध्ये वाहन पार्किंगला जागा नसल्याने नागरिक मिळेल तिथे आपले वाहन उभे करून बाजारहाट करत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. नेरळमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ग्रामपंचायतीने टोईंग व्हॅनचा उतारा केला होता. मात्र तो कामी आला नाही. त्यामुळे नेरळ ग्रामपंचायत व प्रवासी संघटनेने पार्किंगसाठी मध्य रेल्वेकडे मागणी होती. त्याला प्रतिसाद देत मध्य रेल्वे प्रशासनाने नेरळमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पे अँड पार्कची सुविधा उपलब्ध करून दिल्याने बाजारपेठेतील दुचाकी, चारचाकी वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न निकाली निघाला आहे. या सुविधेचे नेरळकरांकडून स्वागत होत आहे.

नेरळमध्ये कामानिमित्त येणे होत असते. मात्र पार्किंगची सोय नसल्याने जागा मिळेल तिथे गाडी उभी कारावी लागत होती. मात्र आता मध्य रेल्वेकडून पार्किंगची सोय उपलब्ध झाली आहे, या निर्णयाचे स्वागत आहे.

-अरविंद कटारिया, माजी अध्यक्ष, नेरळ व्यापारी फेडरेशन

Check Also

पनवेल, उरणमधील रेल्वे प्रवाशांच्या समस्या मार्गी लावणार

महाप्रबंधक धरमवीर मीना यांचे आश्वासन मुंबई : रामप्रहर वृत्त पनवेल, उरणमधील रेल्वेशी संबंधित समस्या 31 …

Leave a Reply