Breaking News

मतदानाच्या दिवशी सुटी जाहीर

मुंबई : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी राज्य शासनाने अधिसूचनेद्वारे मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. ही सुटी कामासाठी आपल्या लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्राबाहेर असतील अशा कर्मचार्‍यांनाही लागू असेल. राज्य व केंद्र शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, तसेच अकृषी, कृषी आणि अन्य विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, शिक्षण संस्था आदींनाही ही अधिसूचना लागू राहणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिल  रोजी वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार असून, त्या दिवशी संबंधित मतदारसंघात सार्वजनिक सुटी राहील. बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर या दुसर्‍या टप्प्यातील मतदारसंघांसाठी 18 एप्रिल या मतदानाच्या दिवशी सुटी असेल. तिसर्‍या टप्प्यातील जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांत 23 एप्रिल या मतदानाच्या दिवशी सुटी असेल; तर राज्यातील चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यातील नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण, मावळ, शिरूर आणि शिर्डी या मतदारसंघांत 29 एप्रिल रोजी मतदान होणार असून, या दिवशी सार्वजनिक सुटी राहील.

Check Also

खारघरच्या रामशेठ ठाकूर महाविद्यालयाला ’नॅक’ची ए श्रेणी प्राप्त

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर …

Leave a Reply