माथेरान ः प्रतिनिधी
दरवर्षी माथेरान नगरपरिषदेच्या माध्यमातून विकासकामे केली जात असतात. काही ऑनलाइन निविदा प्रक्रिया असतात तर काही ऑफलाइन असतात. यामध्ये ऑफलाइन निविदांची बहुतांश कामे ही स्थानिकांना दिली जात नाहीत. परिसरातील आपल्याच एखाद्या मर्जीतील व्यक्तीला इथल्या विकास कामांमध्ये समाविष्ट केले जात आहे. तर स्थानिक कार्यकर्ते हे केवळ निवडणुकीपुरता झेंडा हाती घेऊन आपापल्या पक्षाशी एकनिष्ठेने काम करीत असतात. होत असणारी कामेसुध्दा निकृष्ट दर्जाची असली तरीसुद्धा त्यावर पांघरूण घातले जाते. हेतूपुरस्सर दुर्लक्ष करून मर्जीतील लोकांना कामे दिली जात आहेत. याबाबतीत गावात नेहमीच तर्कवितर्क आणि उलटसुलट चर्चा ऐकावयास मिळत आहे. निदान विकासकामे पूर्ण करण्यासाठी स्थानिकांना प्राधान्य द्यावे, जेणेकरून ते आर्थिक दृष्टीने आपल्या कुटुंबाला आधार देऊन निवडणूक काळात सहकार्य करतील. ही भावना जर अंगिकारली नाही तर आगामी काळात निवडणुकीत काय घडामोडी घडतील, हेदेखील येत्या काळात बघायला मिळणार आहे, अशी चर्चा आहे.