पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने रस्त्याचे काम रखडून लोकांची गैरसोय होऊ नये, यासाठी गाढी नदीच्या किनार्याजवळ भिंगारी गावासमोर राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचे आणि महामार्ग रूंदीकरणाचे, तसेच सर्व्हिस रस्त्याचे काम सुरू आहे, त्या ठिकाणी कामाला लागणारे कच्चे साहित्य आणि कामगारांना तात्पुरता निवारा व बसण्यासाठी सोय म्हणून असलेले गाळे तूर्त पाडले नाहीत. काम पूर्ण झाल्यावर गाळे हे तोडण्यात येणार आहेत, असे महापालिकेकडून स्पष्ट झाले असतानाही ज्याने तत्कालीन आयुक्त सुधाकर शिंदे यांची तळी उचलल्यामुळे एलबीटी अनुदानाचे महापालिकेचे दरवर्षी शेकडो कोटी रुपयांचे कायमचे नुकसान केले, त्यानेच जनतेची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केल्याचे आता पनवेलकरांच्या लक्षात आले आहे, अशा शब्दांत भाजपचे महापालिका प्रवक्ते व नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनी सुपारीबाजांची पोलखोल केली आहे.
भिंगारीजवळील गाळे टीआयपीएल कंपनीने बांधलेले नाहीत. त्याची मालकी दुसर्याची आहे हे स्वतःच कबूल करीत असताना स्वतःच्या खोट्या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी टिमकी वाजविणार्याने हे टीआयपीएलच्या अनधिकृत बांधकामास संरक्षण म्हणणे म्हणजे मूर्खपणाच आहे. काही वर्षांपूर्वी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा मंडप घालताना या महाशयांनी पालिकेची परवानगी न घेता बेकायदेशीररीत्या झाडांची व फाद्यांची कत्तल केली. यामुळे जनतेचा उद्रेक झाल्यामुळे जनतेची माफी मागावी लागली, हे आपण सोयीस्करपणे विसरला असलात, तरी जनतेच्या मनात जखमा ताज्या आहेत. त्याचप्रमाणे रुग्णालय आणि शाळा जवळ असताना ध्वनिप्रदूषणाचेही नियम धाब्यावर बसविले. स्वतः गणेशोत्सवात नियमाचे उल्लंघन करून लोकांची गैरसोय करणार्याने दुसर्याला नाहक बदनाम करण्याचे काम करणे म्हणजे स्वतःचे हसे करून घेण्यासारखेच आहे.
सामाजिक स्वास्थ्याची खोटी कणव दाखवून लोकांची दिशाभूल करणार्या या महाभागाने सुधाकर शिंदे यांचे तुणतुणे घेऊन काम केल्याचे पनवेलच्या जनतेने पहिले आहे. त्यामुळे पनवेल महापालिकेचे दरवर्षी शेकडो कोटी रुपयांचे कायमचे नुकसान झाल्याने अनेक विकासाची कामे रखडणार आहेत याची जाणीव आता सुज्ञ पनवेलकरांना झाल्याने त्यांनी यांची साथ सोडलीच, शिवाय ज्या पक्षाचे ते काम करीत आहेत त्या पक्षाच्या नेत्यांनीही यांच्याकडे पाठ फिरविल्याचे दिसून येते. परिणामी अस्वस्थ होऊन जनमानसात आपली प्रतिमा सुधारण्यासाठी त्यांचा हा सारा आटापिटा आहे.
आपल्या स्वार्थापोटी काम करणार्या या महाभागाला ‘सुपारी मास्टर’ म्हणून लोक ओळखू लागले आहेत. लोकांच्या हिताची एवढी काळजी असेल, तर प्रथम स्वतःच्या संघटनांमधील रिक्षा नियमानुसार चालवून दाखवा. स्वतः नियम धाब्यावर बसविण्याचे काम करणार्यांनी तोंडी वाफा सोडू नयेत; कारण या महाशयांनी आपल्या संघटनेचे रिक्षा स्टँड महापालिका हद्दीत ठिकठिकाणी आरटीओ व वाहतूक शाखेची परवानगी न घेता कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे जागोजागी थाटले आहेत. त्यामुळे रहदारीला होत असलेला अडथळा आणि नागरिकांना होणारा त्रास याचा विचार न करणार्याने आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर खोटे आरोप करणे म्हणजे महामुर्खाने पंडिताला अक्कल शिकविण्यासारखे आहे.उलट स्वतःची मनमानी आणि हम करे सो कायदा लादल्यामुळे स्वतःच्या संस्थेतील माणसे टिकवता आली नाहीत, हे सर्व पनवेलकरांना माहीत आहे. तुमच्या खोटेपणाच्या पावत्याच जगजाहीर आहेत.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी आयुक्त गणेश देशमुख यांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांकडून पाण्याची तत्कालीन आयुक्त सुधाकर शिंदे यांच्यामुळे रद्द झालेली योजना पुन्हा मिळवण्यात यश मिळवले. त्यामुळे यांना पोटदुखी झाली. जनतेचा यांच्यावरील विश्वास उडाल्याने यांच्या सभा आणि मोर्चाकडे पनवेलकरांनी पाठ फिरवली. त्यामुळे आपली अस्वस्थता लपवण्यासाठी आमदारांवर शिंतोडे उडवण्याचे काम कोणाची सुपारी घेऊन केले जात आहे, याचा खुलासा त्यांनी जनतेकडेच करावा, असे खुले आव्हान बिनेदार यांनी दिले आहे.
ही तर कामाची पद्धत
टीआयपीएल कंपनी नामांकित आहे. त्यांना बोगस किंवा अनधिकृत काम करण्याची काही एक जरुरी नाही. अनेक वर्षे ही कंपनी आपल्या सचोटीने दर्जेदार काम करीत आलेली आहे. कुठेही काम करावयाचे असल्यास स्वतःच्या किंवा भाड्याच्या तात्पुरत्या जागेत निवारा आणि साधनसामग्रीसाठी व्यवस्था करावी लागते. काम पूर्ण झाल्यावर मात्र कंपनी तेथेच चिकटून राहत नाही. अशाचप्रकारे कंपनीमार्फत काम सुरू असलेल्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात शेड्स उभारण्यात आल्या आहेत. ही कामाची पद्धत आणि भाग असतो, परंतु तुमच्यासारखे जागा बळकविण्याचे काम आम्ही करीत नाही, असे खडे बोल बिनेदार यांनी सुनावले आहेत.