खंडाळा : प्रतिनिधी
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खंडाळा येथील बोगद्याजवळील धोकादायक दरड हटवण्याचे काम मंगळवार (दि. 12) पासून हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे पुढील आठवडाभर येथे टप्प्याटप्प्याने काही काळासाठी वर्कब्लॉक घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून एक्स्प्रेस वेवरील खंडाळा येथील बोगद्यादरम्यान ढिल्या झालेल्या दरडींचे दगड काढण्याचे काम 12 ते 20 मार्चदरम्यान करण्यात येणार आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून मंगळवारी सकाळी 10 वाजता 15 मिनिटांचा ब्लॉक घेण्यात आला होता. या काळात मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.
ब्लॉकच्या काळात दिवसभरात पाच टप्प्यांत 15-15 मिनिटे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे खंडाळा बोगद्याजवळ वाहतूक दिवसभरातून पाचदा 15 मिनिटांकरिता पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे, तसेच 15 मार्च रोजी दुपारी सव्वातीन वाजल्यापासून 18 मार्च रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत वाहतूक चालू ठेवण्यात येणार आहे.