Breaking News

डॉ. सुजय विखे-पाटील भाजपमध्ये

मुंबई : प्रतिनिधी

भाजपला पराभूत करण्याची स्वप्ने पाहणार्‍या काँग्रेसला महाराष्ट्रात मोठा दणका बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय यांनी मंगळवारी (दि. 12) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

डॉ. सुजय विखे-पाटील यांच्यासह नगरमधील पक्षाची एक फळीच भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या गरवारे क्लब हाऊसमध्ये झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सदाभाऊ खोत, माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार शिवाजी कर्डिले उपस्थित होते. त्याचप्रमाणे नगर जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती. त्यांनी डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या पक्षप्रवेशानंतर भाजपचा विजय असो अशा घोषणा दिल्या.

या वेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारत हा आता कमजोर देश नाही; तर मजबूत देश आहे. यामुळे संपूर्ण देशातील तरुणाई भाजपकडे येते आहे. डॉ. सुजय विखे-पाटील हे याच पिढीचे प्रतिनिधित्व करतात. जे गरीब, दीन-दलित, शोषितांच्या पाठीशी आहेत, त्यांच्या सोबत जाण्याचा निर्णय सुजय यांनी घेतला आहे. भाजपचा कार्यकर्ता पक्षाचा मालक असतो. या पक्षातून चहा विकणारा माणूस देशाचा पंतप्रधान होतो. नगर जिल्हा आता भाजपचा बालेकिल्ला असून, पक्षात येताना सुजय विखे-पाटील यांनी कुठलीही अट ठेवली नसल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी केला.

अनेक पक्षांना आता उमेदवार सापडत नाही. 2014च्या निवडणुकीत जेवढ्या जागा जिंकल्या त्याहून अधिक जागा येणार्‍या 2019 लोकसभा निवडणुकीत आम्ही जिंकू. महाराष्ट्रात आणि देशात पुन्हा भाजपची सत्ता येईल. नगरची जागाही विक्रमी मतांनी निवडून येणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

डॉ. सुजय विखे-पाटील यांना घरच्यांशी बंड करून भाजप प्रवेशाचा निर्णय घ्यावा लागला. सुजय यांचा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय आज नाही, तर उद्या त्यांच्या घरच्यांनाही पटेल. सुजय यांचा निर्णय योग्य असल्याचे घरच्यांना लक्षात येईल.
-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply