Breaking News

रत्नागिरीतील पूरस्थिती आटोक्यात ; दूध, भाजी, इंधनाची मात्र टंचाई

रत्नागिरी : प्रतिनिधी

 जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्याने खेड, चिपळूण, राजापूर तालुक्यातील पुराचे पाणी ओसरले आहे. त्यामुळे जनजीवन सुरळीत झाले आहे, मात्र कोल्हापूर, सांगली, सातारा येथे मुसळधार पाऊस सुरूच असल्याने दूध, भाजी आणि पेट्रोल-डिझेलच्या गाड्या जिल्ह्यात येऊ शकल्या नाहीत. त्यामुळे दूध, भाजी आणि इंधनाची टंचाई जाणवू लागली आहे, तर रत्नागिरी तालुक्यातील कोळंबे येथे डोंगराला भेगा गेल्याने येथील लोकांना स्थलांतराच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात 2 ऑगस्टपासून धुवाँधार कोसळणार्‍या पावसाने दोन दिवस विश्रांती घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खेड, चिपळूण आणि राजापूर शहरातील पुराचे पाणी ओसरले आहे. पुराचे पाणी ओसरल्यामुळे शहरातील जनजीवन पूर्ववत झाले असून, व्यापार्‍यांनी दुकानातील घाण साफसफाई करण्यास सुरुवात केली आहे, तर नागरिकांनी पुराच्या पाण्यामुळे आलेला चिखल साफ करण्याचे काम हाती घेतले आहे.

मंडणगड, दापोली, गुहागर सुरळीत

तालुक्यात पावसाने पूर्णत: विश्रांती घेतल्याने मंडणगड, दापोली, गुहागर तालुक्यातील जनजीवन सुरळीत सुरू झाले आहे. शाळा, महाविद्यालये सुरू झाली असून, बससेवाही सुरू करण्यात आली आहे.

कराड, सांगली, सातारा बससेवा बंदच

दोन दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने चिपळूण शहरातील पुराचे पाणी बुधवारपासून ओसरू लागल्याने जनजीवन सुरळीत झाले आहे. शहरातील शाळा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत. दुकानदारांनीदेखील आपली दुकाने सुरू केली आहेत. शहरातील बससेवा सुरू करण्यात आली असली तरी पावसामुळे कराड, सांगली, सातारा मार्गावरील बससेवा अजूनही बंद ठेवण्यात आली आहे. रत्नागिरी, गुहागर या मार्गावरील बससेवा सुरू करण्यात आली आहे. दूध व भाजीपाल्याची वाहने न आल्याने शहरात त्याची टंचाई जाणवू लागली आहे.

लांजात डिझेलचा तुटवडा

तालुक्यातील जनजीवन सुरळीत झाले असले तरी डिझेलच्या गाड्या तालुक्यात न आल्याने बससेवेवर परिणाम झाला आहे. तालुक्यातील काही फेर्‍या डिझेलअभावी बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्याचा फटका ग्रामीण भागातील लोकांना बसणार आहे.

रत्नागिरीत डोंगराला भेगा

रत्नागिरी तालुक्यातील कोळंबे वरचीवाडी येथील डोंगराला भेगा पडल्याची घटना घडली आहे. त्यामुळे एक घर प्रभावित होण्याची शक्यता आहे. येथील कुटुंबाला स्थलांतर करण्याच्या लेखी सूचना प्रशानातर्फे देण्यात आल्या आहेत. तालुक्यातील चांदेराई, हातिस, पोमेंडी या भागातील पुराचे पाणीही ओसरल्याने ग्रामस्थांनी आपल्या दैनंदिन कामांना सुरुवात केली आहे. रत्नागिरीत डिझेल, पेट्रोलच्या गाड्या न आल्याने वाहनचालकांनी पेट्रोलसाठी पेट्रोलपंपावर गर्दी केली होती.

राजापुरात पिण्यासाठी पाणी नाही

अर्जुना आणि कोदवली नदीला आलेल्या पुरामुळे राजापूर शहरात पुराचे पाणी मुख्य बाजारपेठेपर्यंत आले होते. त्यामुळे शहरातील व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले होते. दोन दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने बाजारपेठेतील पाणी ओसरले आहे. त्यामुळे दुकानदार तसेच नागरिकांनी साफसफाईची मोहीम हाती घेतली आहे. दुकाने व घरात आलेला चिखल साफ करण्याचे काम सुरू आहे. पुराच्या पाण्यामुळे नागरिकांना पुरवठा करणार्‍या पिण्याची पाण्याची यंत्रणा कोलमडून गेली आहे. त्यामुळे पिण्यासाठी पाणी नसल्याची अवस्था आहे.

जगबुडीवरील वाहतूक सुरू

खेड तालुक्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती, मात्र पुराचे पाणी ओसरल्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली आहे. खेड शहरातीलही जनजीवन सुरळीत झाले आहे.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply