Breaking News

कोरोना लशींचे यश

अवघ्या विश्वाला त्रस्त करून सोडणार्‍या कोरोना महामारीवर अखेर एकापाठोपाठ एक लशी येऊ लागल्या आहेत. आपल्या भारतातही कोविड-19 विषाणूवरील दोन लशींना मंजुरी मिळाली असून, नववर्षात लसीकरणाला सुरुवात होणार आहे. कोरोनाचे देशातून समूळ उच्चाटन होण्यास प्रतिबंधक लस महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

कोरोनाने जगभर प्रचंड उलथापालथ केल्यानंतर आणि काही देशांमध्ये कोविड विषाणूचा प्रादुर्भाव अद्यापही थांबण्याचे नाव घेत नसताना त्यावर लशी उपलब्ध होणे दिलासादायक म्हटले पाहिजे. लसीकरणात ब्रिटनने आघाडी घेतलीय. ब्रिटनमध्येे सर्वप्रथम फायझर-बायोएनटेकच्या लशीला मंजुरी देण्यात आली. अमेरिकेत मॉडर्ना आणि फायझर लस दिली जात आहे. रशियाने स्पुटनिक व्ही लस तयार केली असून, अनेकांवर त्याची चाचणी करण्यात आली आहे. कोरोनाची दुसरी लाट आणि नव्या प्रकाराचा (स्ट्रेन)सामना करणार्‍या ब्रिटनमध्येे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि अ‍ॅस्ट्राझेनेक कंपनीद्वारे विकसित केल्या गेलेल्या लशीला काही दिवसांपूर्वी मान्यता देण्यात आली. ही ब्रिटनची दुसरी लस. या देशाला तशी गरजच होती. जागतिक महासत्ता अमेरिकेसह इंग्लंडही कोरोनाशी अद्याप झुंजतच आहेत किंबहुना तेथील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट बनत चालली असल्याचे विदारक चित्र आहे. त्या तुलनेत भारतासह काही देशांमध्ये कोरोनाला थोपवून धरण्यात यश आले आहे. अशातच कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींच्या भारतातील आपतकालीन वापरास केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील विशेष समितीने मंजुरी दिली आहे. तसे पाहिले तर आपल्या देशात काय आणि जगात काय कोरोना प्रतिबंधक लशी उशिराच आल्या. आपल्याकडील कोरोनाचा आवेग हळूहळू संपुष्टात येत आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढत असून, मृत्यूदरही घटला आहे. तरीदेखील कोरोनाचा भयावह अनुभव पाहता लसीकरण केव्हाही चांगलेच. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लशींना स्वदेशीची झालर असल्याने भारतासाठी ही अभिमानाची बाब आहे आणि यासाठी शास्त्रज्ञ-वैज्ञानिकांचे अभिनंदन! त्याचप्रमाणे देशाचे खंबीर नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे सहकारीही या कौतुकास पात्र ठरतात. त्यांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईत तमाम देशवासीयांना हरप्रकारे पाठबळ, प्रोत्साहन दिले. त्यामुळेच आज इतर देश डगमगलेल्या अवस्थेत असताना भारत नव्या जोमाने वाटचाल करताना पहावयास मिळत आहे. सरते वर्ष कोरोना प्रादुर्भावाचे होते, तर नववर्ष कोेरोनावरील लशींचे असणार आहे. देशात सध्या दोन लशींना मान्यता मिळाली असून, आणखी काही लशींवर संशोधन सुरू आहे. मोदी सरकारने लसीकरणासाठी पूर्वतयारी सुरू केली आहे. त्या दृष्टीने लशीचे ड्राय रन म्हणजेच रंगीत तालीम घेण्यात येत आहे. अशा प्रकारच्या घडामोडींमध्ये एकजूट अपेक्षित असताना काही विरोधी पक्ष, संघटना मात्र राजकारण करून लशींविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. त्यांनी विचार करून वक्तव्ये करावीत. कारण ज्यांच्या हाती आपल्या देशाचे नेतृत्व आहे त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर देशवासीयांनी शिक्कामोर्तब केलेले आहे. एवढेच नव्हे तर पंतप्रधान मोदी हे जगातील सर्वांत स्वीकारार्ह नेते असल्याचे नुकतेच एका सर्व्हेमध्ये दिसून आले आहे. तेव्हा विरोधकांनी राजकीय अस्तित्वासाठी बेतालपणे बडबडू नये. यातून शास्त्रज्ञ-वैज्ञानिकांनाचाही अपमान होतो. कुणी किती म्हटले तरी भारताची प्रगती थांबणार नाही.

Check Also

करिअरविषयक मार्गदर्शन सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्तसध्या जगात एआय तंत्रज्ञानावर आधारित सर्वाधिक संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयसोबत लवकरच परिचित …

Leave a Reply