Breaking News

सीएएला घाबरू नका -उद्धव ठाकरे; पंतप्रधानांच्या भेटीनंतर कायद्याबाबत अनुकूलता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

सीएए आणि एनआरसीच्या विषयावर पंतप्रधानांशी चर्चा झाली असून हा कायदा नागरिकत्व देण्याचा कायदा आहे. या कायद्याला घाबरण्याचे काहीही कारण नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. दिल्लीमध्ये शुक्रवार (दि. 21) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घेऊन चर्चा केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी ते म्हणाले, राज्याला सहकार्य करण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले आहे. महाराष्ट्राला दिल्लीच्या सहकार्याची गरज आहे. पंतप्रधानांच्या भेटीत अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाल्याचेदेखील त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, पंतप्रधानांच्या भेटीत सीएए आणि एनआरसीवर विस्तृत चर्चा झाली. याविषयी ‘सामना’च्या माध्यमातून मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. ‘सीएए’ला घाबरण्याची आवश्यकता नाही. ‘एनआरसी’वरही संसदेत भूमिका स्पष्ट केली आहे. ते फक्त आसामपुरते मर्यादित आहे, असेही ठाकरे म्हणाले. एनआरसी हा फक्त आसाममध्येच लागू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींशी केलेल्या

चर्चेनंतर दिली आहे, तर एनपीआर हा जनगणनेचा भाग असल्याने त्याला विरोध नसल्याचेही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले.

या भेटीत राज्याच्या विकासासह महाराष्ट्रातील इतरही प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली. मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच दिल्लीत आलो आहोत. राज्य आणि केंद्र सरकारमध्ये कोणताही वाद नाही. राज्यपाल आणि सरकारमध्येदेखील वाद नाही, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीएए आणि एनआरसीबाबत आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा तिन्ही कायद्यांना तीव्र विरोध आहे. अशात उद्धव ठाकरेंनी कायद्यासंदर्भात मांडलेल्या भूमिकेनंतर सोनिया गांधी आणि शरद पवार काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply