Breaking News

गणेशमूर्ती उंचीची अट शिथिल करा; रायगडातील मूर्तिकार आणि कारखानदारांची मागणी

पेण ः प्रतिनिधी

दोन महिन्यांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असल्याने मूर्तिकारांच्या कामाला वेग आला आहे, मात्र राज्य सरकारकडून गणेशमूर्तींच्या उंचीवर निर्बंध घातल्याने मूर्तिकार अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर गणेशमूर्तींवरील उंचीची अट शिथिल करण्याची मागणी रायगड जिल्ह्यातील पेण येथील मूर्तिकार आणि कारखानदारांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी मूर्तिकारांशी चर्चा करून निर्बंध निश्चित करावेत, असे मतही व्यक्त करण्यात आले आहे. गणेशोत्सव हा कोकणी आणि हिंदू धर्मियांचा महत्त्वाचा उत्सव असून अनेकांची श्रद्धा या उत्सवाशी जोडलेली आहे. त्यातच रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील हजारो कारखानदार आणि कामगारांची उपजीविका ही याच गणेशाच्या मूर्त्यांच्या उद्योगावर अवलंबून आहे. गेल्या वर्षभरात झालेली वादळे आणि कोरोनाच्या निर्बंधांमुळे या व्यावसायिकांवर आर्थिक संकट ओढावले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, यंदादेखील गणेशोत्सव हा साधेपणाने साजरा करण्याचे आदेश देण्यात आल्याने गणपतीच्या मूर्तीवर उंचीची मर्यादा ही घरगुती गणपतीसाठी दोन फूट आणि सार्वजनिक मूर्ती चार फूट ठेवण्यात आली आहे. शासनाच्या या निर्बंधांमुळे यंदाही या कारखानदारांना 60 टक्के नुकसान सहन करावे लागणार आहे. म्हणून गणेशमूर्तींवरील उंचीची अट शिथिल करण्याची मागणी मूर्तिकार आणि कारखानदारांनी केली असून कोणताही निर्णय घेताना राज्यातील गणेशोत्सव मंडळ आणि संबंधितांशी चर्चा करूनच नियमावली जाहीर करावी, अशी विनंती करण्यात येत आहे. गेल्या वर्षभरापासून गणपती कारखानदार आणि मूर्तिकार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्याचा प्रयत्न करीत असून मुख्यमंत्र्यांनी मूर्तिकारांशी चर्चा करून निर्बंध निश्चित करण्याची मागणी करण्यात येत आहे तसेच गणेशमूर्तींवरील निर्बंध कायम ठेवल्यास घरातील दोन कामगारांना सरकारी नोकरी देण्याची मागणी करण्यात येत असून यंदादेखील नुकसान झाल्यास बँकांकडून घेतलेल्या कर्जापोटी आत्महत्या करावी लागणार असल्याची खंत कारखानदार आणि मूर्तिकारांनी व्यक्त केली आहे. 

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply