आमदार रविशेठ पाटील यांची विधानसभेत मागणी
पेण : प्रतिनिधी
खारेपाट विभागातील हेटवणे-शहापाडा पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करण्याची मागणी आमदार रविशेठ पाटील यांनी विधानसभेत अधिवेशनात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली. पेण तालुक्यातील खारेपाट विभागातील 36 गावे व 42 वाड्यांकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत हेटवणे- शहापाडा ही पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. सदर योजनेच्या कामाची मुदत संपुनदेखील अद्यापपर्यंत केवळ 50 ते 60 टक्के काम झाले असल्याने ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत आहे. ही बाब आमदार रविशेठ पाटील यांनी सदर लक्षवेधीव्दारे पाणीपुरवठा मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली व सदर योजनेमधील सर्व गावे आणि वाड्यांना पाणीपुरवठा होण्याच्या द़ृष्टीने काम पुर्ण होण्याबाबत कार्यवाही करण्याची मागणी केली. या पाणी पुरवठा योजनेचे 70 टक्के काम पुर्ण झाले असून, उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत. या योजनेच्या कंत्राटदारावर विलांबासाठी दंड आकारण्यात आला आहे, असे स्पष्ट करून पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी, सदर योजनेतील समाविष्ट गावांना उन्हाळ्यापर्यंत पाणीपुरवठा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे लक्षवेधीवर दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले.