खारघरमध्ये श्री गाडगेबाबा धर्मशाळेचे उद्घाटन

पनवेल ः वार्ताहर

कै. सतीश हावरे यांच्या स्मरणार्थ उज्ज्वला सतीश हावरे यांनी खारघर सेक्टर 20 येथे रुग्णसेवेसाठी विनामूल्य उपलब्ध करून दिलेल्या शारदा सदन इमारतीमध्ये श्री गाडगेबाबा धर्मशाळा सुरू करण्यात आली आहे. या धर्मशाळेचे उद्घाटन राज्याच्या महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. 21) करण्यात आले.

या कार्यक्रमास हावरे इंजिनिअर्स अ‍ॅण्ड बिल्डर प्रा.लि.च्या उज्ज्वला हावरे, श्री गाडगे महाराज मिशनचे कार्याध्यक्ष मधुसूदन मोहिते, उपाध्यक्ष उत्तमराव देशमुख, सचिव विश्वनाथ नाचवणे, सचिव सचिन घोंगटे, खजिनदार ज्ञानदेव महाकाळ, अशोक पाटील, गाडगे महाराजांचे त्या काळातील चालक 93 वर्षीय भाऊराव काळे, प्रवीण हावरे, नगरसेविका नेत्रा पाटील, भाजप शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल आदी उपस्थित होते. तत्पूर्वी या संस्थेसाठी रुग्णसेवा गाडी देण्यात आली. त्याचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी बोलताना महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले की, गाडगेबाबांच्या तत्वाला मानणार्‍या अनेक व्यक्ती या समाजात त्यांच्या विचाराने प्रेरित आहेत. त्यामुळे देशाला चांगले दिवस येणार आहेत यात शंका नाही. आज अनेकांकडे पैसा आहे, पण पैसे खर्च करणे त्यांच्याकडे दानत नाही, परंतु हावरे कुटुंबीय याला अपवाद असल्याचे सांगितले तसेच त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्याचे कौतुक केले.

आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, दररोज वेगवेगळे कार्यक्रम करत असतो, परंतु त्या कार्यक्रमापैकी एखादा कार्यक्रम कायम स्मरणात राहतो. त्यातील आजचा कार्यक्रम आहे. आजचा खर्‍या अर्थाने प्रेरणा दिवस असून या कामाचे अनुकरण प्रत्येकाने करून संत गाडगे महाराजांचा आदर्श सर्वांनी डोळ्यासमोर ठेवला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. उज्ज्वला हावरे म्हणाल्या की, आज मला स्वप्नपूर्ती झाल्याचा आनंद होत आहे. ही वास्तू म्हणजे एक मनाला समाधान देणारी वास्तू असून या ठिकाणी 62 बेडची व्यवस्था केली आहे. साधारण वर्षभरात 22 हजार लोक या वास्तूचा फायदा व उपयोग करून घेतील. अशा प्रकारच्या कार्यामुळे नवनवीन काम करण्याची प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्याध्यक्ष मधुसूदन मोहिते यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, 1952मध्ये गाडगे महाराज मिशनची स्थापना केली असून लोकांची व गोरगरीबांची सेवा करा, भूकेलेल्यांना अन्न द्या, गरजूंना शिक्षण द्या हा मानवतेचा संदेश गाडगेबाबांनी आम्हाला दिला आहे. त्याचे आचरण आम्ही करीत असून संपूर्ण महाराष्ट्रात संस्थेमार्फत काम सुरू आहे.

Check Also

The member group is always indeed there to aid when needed

Partypoker are an extremely valued spouse for people. And greatest of all – the value …

Leave a Reply