Breaking News

मत्स्यविकास विभागाची 12 बोटींवर कारवाई

मांडवा समुद्रात बेकायदा मासेमारीसाठी आणलेले लाखो रुपयांचे साहित्य जप्त

अलिबाग : प्रतिनिधी

कोकण किनारपट्टीवर एलईडी दिव्यांच्या सहाय्याने तसेच अन्य प्रकारे सुरू असलेल्या अनधिकृत मासेमारी विरोधात मत्स्यव्यवसाय विकास विभागाने धडक कारवाई सुरू केली आहे. या विभागाने रविवारी (दि. 5) मांडवा येथे भर समुद्रात केलेल्या कारवाईत बेकायदा मासेमारीसाठी वापरले जाणारे लाखो रूपयांचे साहित्य जप्त करून 12 बोटींवर कारवाई करण्यात आली आहे.

आधीच मासळीचा दुष्काळ असताना एलईडी तसेच पर्ससीन मासेमारीमुळे छोटे मच्छीमार हवालदिल झाले आहेत. अनेकांवर उपासमारीची पाळी आली आहे. याविरोधात अनेक आंदोलने झाली. त्यानंतर मत्स्यव्यवसाय आयुक्त अरूण विधळे सहआयुक्त  राजेंद्र जाधव यांनी धडक कारवाईचे आदेश दिले. त्यांनतर आता मत्स्यव्यवसाय विकास विभागाने पावले उचलली आहेत. अलिबागजवळच्या मांडवा समुद्रात रविवारी रायगडचे सहाय्यक आयुक्त अभयसिंग शिंदे इनामदार व परवाना अधिकारी स्वप्नील दाभणे यांनी आपल्या नियमित गस्तीपथकासह स्वतः कारवाईत भाग घेतला. यावेळी त्यांनी 16 बोटींची तपासणी केली. यातील एका बोटीवर 13 एलईडी पॅनल, 2000 वॅटचेचे 4 बल्ब, 3 महागडे सबमर्सिबल बल्ब, फिशींग लॅब बलास्ट, वायरींग, बटणं असे लाखो रूपयांचे साहित्य हस्तगत करण्यात आले. हे साहित्य समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या बोटींना पुरवण्यासाठी नेण्यात येत होते. याशिवाय पर्ससीन मासेमारी करणार्‍या 8 बोटींवर कारवाई करून जाळी जप्त करण्यात आली. ट्रॉलींगव्दारे बेकायदा मासेमारी करणार्‍या तीन बोटींवरदेखील कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. यामध्ये ट्रॉलजाळी कॉडएन्ड कमी ठेवले जाते त्यामुळे छोटे मासे जाळयात येतात. या संपूर्ण कारवाईत लाखो रूपयांचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.

एलईडी तसेच पर्ससीन मासेमारी विरोधात स्थानिक पारंपरिक मच्छीमारांनी अनेकदा आवाज उठवला होता. मासेमारी बंद ठेवत त्यांनी निषेध व्यक्त केला होता. लोकसभा निवडणुकीच्या काळातदेखील या विषयावर बरीच चर्चा झाली होती.

पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी यासंदर्भात थेट केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करून लक्ष घालण्याची विनंती केली होती. आता मत्स्यव्यवसाय विकास विभागाच्या या कारवाईमुळे बेकायदा मासेमारी करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. तसेच पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणार्‍या छोट्या मच्छीमारांना यामुळे दिलासा मिळाला आहे.

ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार आहे. एलईडी व अन्यमार्गाने होणारी बेकायदा मासेमारी बंद करण्यासाठी आमचे पथक समुद्रात गस्त घालत असते. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यासाठी आग्रही आहेत. त्यांच्याबरोबरच जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांचेही या कामी सहकार्य मिळत आहे.

-अभयसिंग शिंदे इनामदार, सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply