जयपूर : वृत्तसंस्था
महाराष्ट्राच्या पुरुषांनी शेवटच्या साखळी सामन्यात हिमाचल प्रदेशचा 46-20 असा धुव्वा उडवीत जोरदार आगेकूच केली. जयपूर कबड्डी असोसिएशनच्या वतीने पूर्णिमा विद्यापीठाच्या संकुलातील मॅटवर झालेल्या सामन्यात महाराष्ट्राने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करीत हा पराक्रम केला.
महाराष्ट्राच्या संघाने पहिल्या पाच मिनिटांतच हिमाचलवर लोण देत आपला इरादा स्पष्ट केला. 18व्या मिनिटाला दुसरा लोण देत आघाडी वाढवित नेली. मध्यांतराला 22-06 अशी आघाडी होती. उत्तरार्धात 24व्या व 39व्या मिनिटाला आणखी दोन लोण दिल्याने सामना एकतर्फी केला. महाराष्ट्राच्या विजयात पंकज मोहिते, अजिंक्य पवार, शुभम शिंदे, रोहित बने चमकले. शुभमने चढाईत आठ, तर अजिंक्यने पाच गुण घेतले. शुभम शिंदे व रोहितने प्रत्येकी पाच पकडी यशस्वी केल्या. हिमाचलच्या विशाल भारद्वाजने पाच, तर रामगोपालने तीन पकडी केल्या. नवीन कुमार, अजय ठाकूर यांना या सामन्यात सूर सापडला नाही. नवीनला तीन गुण मिळविता आले, तर अजयला तीन चढाईत एकही गुण मिळविता आला नाही. सुशांत साईलला शेवटच्या काही मिनिटांत खेळविण्यात आले. त्यात त्याने एका चढाईत तीन गुणांसह पाच गुण वसूल केले.
दुसरीकडे महिलांच्या अ गटात महाराष्ट्राचे आव्हान मात्र संपुष्टात आलेले आहे. रेल्वेला चुरशीची लढत देत अवघ्या एका गुणाने पराभूत होणार्या महाराष्ट्राच्या महिला संघाला तामिळनाडूनेही पराभवाचा धक्का दिल्याने सलग दुसर्या वर्षी बाद फेरी गाठण्यात अपयश आले.